Mohammed Shami l IPL 2025 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या मोहम्मद शमीवर त्याच्या माजी पत्नी हसीन जहांने पुन्हा एकदा खळबळजनक आरोप केले आहेत. कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सामन्यासाठी शमी कोलकात्यात पोहोचताच हसीन जहांने सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्यावर मुलीच्या जबाबदाऱ्या न पाळण्याचा आरोप केला आहे.
हसीन जहांने लिहिलं की, “शमी कोलकात्यात येतो पण कधीही आपली मुलगी आयराला भेटायला येत नाही. शेवटच्या वेळेही कोर्टाच्या भीतीने तो मुलीला भेटला होता.” या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेचं वादळ उठलं आहे.
“माझी मुलगी खूप रडली” – हसीन जहांचा आरोप :
हसीन जहांच्या म्हणण्यानुसार, “बकरी ईदच्या आधी माझी मुलगी सारखी शमीला कॉल करत होती. अखेर एकदा त्याने फोन घेतला, पण दुसऱ्या दिवशी तिला म्हणाला की रोज कॉल करू नको. त्यामुळे ती खूप रडली.” हसीनने दावा केला की शमी ना सणासुदीला ना वाढदिवसाला मुलीशी संवाद साधत नाही.
तसेच, तिने शमीवर मुलीला कपडे व आवश्यक वस्तू न पुरवण्याचेही आरोप केले आहेत. या आरोपांनी पुन्हा एकदा दोघांमधील वाद माध्यमांसमोर आला आहे.
Mohammed Shami l शमी-हसीन वादाचा इतिहास :
मोहम्मद शमी आणि हसीन जहां यांची ओळख IPL दरम्यान झाली होती. त्यावेळी हसीन KKR चीअरलीडर होती. २०१४ मध्ये त्यांनी विवाह केला, मात्र चार वर्षांतच त्यांचं नातं तुटलं. २०१८ पासून दोघं वेगळं राहत आहेत आणि मुलगी हसीनसोबतच आहे.
हसीन जहांने यापूर्वीही शमीवर अनैतिक संबंध, घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचे गंभीर आरोप केले होते. प्रकरण सध्या कोर्टात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शमी दर महिन्याला पोटगी म्हणून १ लाख ३० हजार रुपये देतो.






