Hartalika Vrat | भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरितालिका व्रत केले जाते. हे व्रत विशेषतः कुमारिका आणि विवाहित स्त्रिया करतात. या व्रताचा उल्लेख भविष्यपुराणातील हर-गौरी संवादात आढळतो. स्त्रिया पहाटे स्नान करून नवे वस्त्र नेसतात, अलंकार घालतात आणि शिव-पार्वतीची पूजा करतात. केळीच्या पानांचा मंडप उभारून त्यात वाळूचे शिवपिंड किंवा शिव-पार्वतीची मूर्ती स्थापित केली जाते. रात्री स्त्रिया जागरण करतात, भजन-कीर्तन करतात आणि हरितालिका व्रताची कथा ऐकतात. (Hartalika Vrat)
पार्वतीच्या तपश्चर्येची कथा :
एकदा कैलासावर बसलेल्या पार्वतीने भगवान शंकरांना विचारले, “महाराज, सर्वश्रेष्ठ व्रत कोणते?” तेव्हा शंकरांनी सांगितले की हरितालिका हेच सर्वश्रेष्ठ व्रत आहे. पार्वतीने पूर्वजन्मी हिमालय कन्या असताना हेच व्रत केले होते.
त्या काळी पार्वतीने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले. चौसष्ठ वर्षे झाडाची पिकलेली पानं खाल्ली, पाऊस, ऊन आणि थंडी सहन केली. हिमालयाला आपल्या कन्येची अशी कठोर तपश्चर्या पाहून दुःख झाले. त्याच वेळी नारद मुनी आले आणि पार्वतीला विष्णूसोबत विवाह करण्याची सूचना दिली. मात्र, पार्वतीचा निर्धार होता की शिवाशिवाय दुसरा पती स्वीकारायचा नाही.
Hartalika Vrat | पार्वतीचा निर्धार आणि महादेवांचे वरदान :
सखीनं पार्वतीला एका अरण्यात नेलं. तेथे नदीकाठच्या गुहेत पार्वतीने शिवलिंग स्थापित करून उपवास केला. तो दिवस भाद्रपद शुक्ल तृतीयेचा होता. जागरण केल्यानंतर भगवान शंकर स्वतः प्रकट झाले. पार्वतीने त्यांना पती म्हणून मागितले आणि महादेवांनी तिची इच्छा पूर्ण केली. नंतर योग्य मुहूर्तावर हिमालयाने पार्वतीचा विवाह महादेवांशी लावून दिला. या व्रतानं पार्वतीला इच्छित वर मिळाला, म्हणून याला हरितालिका व्रत म्हणतात. (Hartalika Vrat)
या व्रतासाठी मंडप बांधून पार्वती-शंकराची पूजा केली जाते. षोडशोपचाराने त्यांची आराधना करून ही कथा सांगितली जाते. रात्री जागरण करणे अनिवार्य मानले जाते. असे मानले जाते की या व्रतानं स्त्रीच्या आयुष्यातील पाप नष्ट होतात, सौभाग्य वाढते, राज्यप्राप्ती होते आणि सतीत्व लाभते. या दिवशी उपवास न करणाऱ्या स्त्रियांना दारिद्र्य, पुत्रशोक आणि दुःखाचा सामना करावा लागतो, असा समज आहे. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून व्रताचं विसर्जन केलं जातं.






