गुजरातच्या राजकारणात मोठी उलथापालथ; सरकारमधील 16 मंत्र्यांच्या राजीनामा

On: October 16, 2025 5:26 PM
Gujrat
---Advertisement---

Gujrat Goverment | दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या (Gujarat) राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, राज्यात मोठ्या फेरबदलाची तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत उद्याच नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याने, या बदलांमागे २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची रणनीती असल्याचे स्पष्ट होत आहे.

केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत उद्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आपल्या निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीनंतर, सध्याच्या मंत्रिमंडळातील सर्व १७ मंत्र्यांनी आपले राजीनामे सादर केले आहेत. हे राजीनामे आज रात्री राज्यपाल देवव्रत आचार्य (Devvrat Acharya) यांच्याकडे सुपूर्द केले जातील. या नाट्यमय घडामोडींनंतर, नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या, १७ ऑक्टोबर रोजी, गांधीनगर (Gandhinagar) येथील महात्मा मंदिरात (Mahatma Mandir) पार पडणार आहे.

या शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) हे विशेष उपस्थित राहणार आहेत. सहसा मंत्रिमंडळ विस्तारासाठी केंद्रीय नेतृत्वाची इतकी मोठी उपस्थिती नसते, त्यामुळे सरकारमध्ये मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपच्या सर्व आमदारांना आणि मंत्र्यांना पुढील दोन दिवस गांधीनगरमध्येच राहण्याचे निर्देश देण्यात आले असून, संभाव्य मंत्र्यांना फोनवरून माहिती देण्यात आली आहे.

२०२७ ची तयारी आणि काँग्रेसमधून आलेल्यांना संधी?

२०२२ मध्ये दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळात तीन वर्षांपासून कोणताही बदल झाला नव्हता. मात्र, नुकत्याच झालेल्या विसावदर (Visavadar) विधानसभा पोटनिवडणुकीत, मुख्यमंत्री आणि भाजपच्या संपूर्ण ताकदीनंतरही आम आदमी पक्षाच्या (AAP) गोपाल इटालिया (Gopal Italia) यांच्याकडून झालेला पराभव, हा विद्यमान मंत्र्यांच्या कामगिरीवरील असंतोष मानला जात आहे. २०२७ च्या निवडणुकीपूर्वी ‘आप’ची वाढती ताकद आणि सत्ताविरोधी लाट रोखण्यासाठी भाजपने हे मोठे पाऊल उचलले आहे.

या फेरबदलात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या अर्जुन मोढवाडिया (Arjun Modhwadia), अल्पेश ठाकोर (Alpesh Thakor), सीजे चावडा (C.J. Chavda) आणि हार्दिक पटेल (Hardik Patel) यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. तसेच सौराष्ट्रातील जयेश राडाडिया (Jayesh Radadiya) आणि जितू वाघानी (Jitu Vaghani) यांची नावेही निश्चित मानली जात आहेत. तर दुसरीकडे, पुरुषोत्तम सोलंकी (Purshottam Solanki), बच्चूभाई खबर (Bachubhai Khabar) आणि मुकेश पटेल (Mukesh Patel) यांच्यासह काही विद्यमान राज्यमंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

News Title- Gujarat Cabinet Shake-up Ahead of Diwali

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now