दिवाळीनंतर दैनंदिन वापरातील ‘या’ वस्तू स्वस्त होणार? मोदींनी दिले संकेत

On: August 15, 2025 9:40 AM
GST Rate Cut 2025
---Advertisement---

GST Rate Cut | स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांनी देशवासीयांसाठी मोठी घोषणा केली. नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा आणण्यासाठी एक विशेष टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या सुधारणा प्रक्रियेत सामान्य जनतेवरील करभार कमी करणे आणि अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. (GST Rate Cut)

मोदींनी सांगितले की, “दिवाळीत देशवासियांना एक मोठं गिफ्ट मिळणार आहे. टॅक्स कमी करण्याबरोबरच जीएसटी दरांमध्ये मोठी कपात होईल.” त्यामुळे मध्यमवर्गीय आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सध्या 12 टक्के जीएसटी असलेल्या अनेक वस्तू 5 टक्के स्लॅबमध्ये आणण्याचा किंवा 12 टक्के स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे.

कोणत्या वस्तूंवर परिणाम होणार? :

मिळालेल्या माहितीनुसार, दैनंदिन वापरातील आणि घरगुती गरजांसाठी महत्त्वाच्या असलेल्या वस्तूंवर जीएसटी दर कमी होण्याची शक्यता आहे. यात टूथ पावडर, टूथ पेस्ट, छत्री, शिवणकाम मशीन, प्रेशर कुकर व इतर भांडी, इस्त्री, गिझर, लहान वॉशिंग मशीन, सायकल, ₹1000 पेक्षा जास्त किंमतीचे कपडे, ₹500 ते ₹1000 दरम्यानचे बूट-चप्पल, बहुतांश लसी, स्टेशनरी, टाईल्स आणि शेतीची अवजारे यांचा समावेश आहे.

या वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाल्यास ग्राहकांना थेट किंमत कमी होण्याचा फायदा मिळेल. विशेषतः घरगुती बजेटवर ताण असलेल्या कुटुंबांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरेल. तसेच शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांच्या किंमती कमी झाल्यास शेतकऱ्यांच्या खर्चातही बचत होईल. (GST Rate Cut)

GST Rate Cut | अर्थव्यवस्थेवरील परिणाम :

जीएसटी कपातीमुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेत वाढ होईल आणि बाजारपेठेत मागणी वाढण्याची शक्यता आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या काळात दरकपातीमुळे विक्री वाढून उद्योगक्षेत्रालाही चालना मिळेल. लघु व मध्यम उद्योगांना (MSME) विशेषतः फायदा होईल, कारण कमी करामुळे उत्पादन खर्च घटेल आणि स्पर्धात्मकता वाढेल.

पंतप्रधान मोदींच्या (PM Modi) घोषणेनंतर जीएसटी परिषद आणि टास्क फोर्सकडून लवकरच ठोस प्रस्ताव येण्याची अपेक्षा आहे. जर हा निर्णय अमलात आला तर यंदाची दिवाळी खरोखरच ‘डबल दिवाळी’ ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

News Title : GST Rate Cut Likely Before Diwali – Daily Essentials, Appliances, and Farm Tools to Become Cheaper

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now