Govind Barge Death | बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (Govind Barge Death) (वय 34) यांच्या मृत्यूने राज्यभरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी रात्री सासुरे गावात त्यांच्या कारमध्ये मृतदेह सापडला. ही घटना आत्महत्या की घातपात याबाबत गूढ कायम आहे. नातेवाईकांनी थेट घातपाताचा संशय व्यक्त केला असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणात नर्तकी पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) (वय 21) हिला ब्लॅकमेलिंगच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिस तपासात आणि मित्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे मृत्यूपूर्वी गंभीर मानसिक तणावाखाली होते. सततच्या धमक्या, पैशांचा तगादा आणि वैयक्तिक आयुष्यातील ताण यामुळे ते खचले होते, अशी माहिती मिळाली आहे.
मित्रांनी उघड केलेले धक्कादायक तपशील :
गोविंद बर्गे यांच्या निकटवर्तीय मित्रांनी पोलिसांना महत्त्वाचे तपशील दिले आहेत. पूजाशी असलेल्या प्रेमसंबंधांमध्ये ती सतत त्यांच्याकडे नवीन मागण्या करत असे. गेवराईतील बंगला नावावर कर, पाच एकर शेती भावाच्या नावे कर, असे तगादे ती लावत होती. एवढंच नव्हे तर मागण्या मान्य केल्या नाहीत तर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन, अशा धमक्या देखील तिने दिल्या होत्या.
या सर्व दबावामुळे गोविंद मानसिकदृष्ट्या खचले होते. मित्र चंद्रकांत याच्याकडे त्यांनी मन मोकळं करत, “मी खूप निराश झालो आहे”, असे सांगितले होते. पूजाकडून येणाऱ्या धमक्या आणि सततच्या पैशाच्या मागण्यांनी त्यांना प्रचंड त्रास होत होता.
Govind Barge Death | मोबाईल बंद, 5-6 दिवसांचा गूढ काळ :
मित्रांच्या माहितीनुसार मृत्यूपूर्वीच्या 5-6 दिवसांत गोविंद बर्गे पूर्णपणे एकटे झाले होते. त्यांचा मोबाईल बंद होता, कुणाशीही त्यांचा संपर्क नव्हता. ते सतत तणावात असल्याचे मित्रांनी सांगितले. यामुळे आत्महत्येपेक्षा घातपाताचा संशय अधिक गडद झाला आहे.
गोविंद यांनी पूजासाठी लाखो रुपये खर्च केले होते. धाराशिवमधील कलाकेंद्र उभारण्यासाठी आर्थिक मदत, सासुरे गावात घर बांधण्यासाठी पैसे, तसेच महागडे दागिने आणि मोबाईल तिला देण्यात आला होता. तरीही तिच्या मागण्या वाढतच चालल्या होत्या.
मृत्यूच्या रात्रीचं गूढ :
गोविंद विवाहित असून त्यांना दोन मुले आहेत. तरीही गेल्या वर्षभरापासून त्यांचे पूजाशी प्रेमसंबंध होते. मृत्यूपूर्वीच्या रात्री ते पूजाच्या सासुरे गावी गेले होते. तेथे दोघांत नेमकं काय घडलं याबाबत अजून स्पष्टता नाही. पण दुसऱ्या दिवशी पूजाच्या घरापासून काही अंतरावर त्यांच्या कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या डोक्याला गोळी लागलेली होती. (Govind Barge Death)
पोस्टमार्टेम अहवाल आणि तपासाच्या निकालावरून या मृत्यूचं नेमकं सत्य समोर येईल. सध्या मात्र गावकरी, नातेवाईक आणि मित्र हे घातपाताच्या संशयावर ठाम आहेत आणि सखोल चौकशीची मागणी करत आहेत.






