Govind Barge Death Case | बीड जिल्ह्यातील गेवराईमधील माजी उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणात तपासादरम्यान नवनवीन खुलासे होत आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी नर्तिका पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, तिच्या चौकशीतून महत्त्वाचे पुरावे उघड झाले आहेत.
व्हॉट्सअप चॅट आणि कॉल डिटेलमधून उघडकीस आलेले तथ्य :
पोलिसांनी कोर्टात सादर केलेल्या अहवालानुसार, गोविंद बर्गे (Govind Barge) आणि पूजा गायकवाड (Pooja Gaikwad) यांचे व्हॉट्सअप चॅट आणि कॉल डिटेल्स मिळाले आहेत. त्या चॅटमध्ये बर्गे यांनी पूजाला आत्महत्येची धमकी दिली होती, हे धक्कादायक तथ्य समोर आले आहे. याशिवाय, हे दोघेही बीड आणि वैराग येथील विविध लॉजवर एकत्र राहिल्याचे पुरावे पोलिसांनी कोर्टात मांडले.
याआधीच बर्गे यांनी पूजाला ७ लाख रुपयांचा पावणे दोन गुंठ्यांचा प्लॉट विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. आता तपासात पूजाच्या बँक खात्यात बर्गे यांच्या नावाने आर्थिक व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी पूजाच्या मैत्रिणी आणि सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले आहेत.
Govind Barge Death Case | पूजाची न्यायालयीन कोठडी आणि जामिनाची शक्यता :
सोमवारी (१५ सप्टेंबर) पूजाची पोलिस कोठडी संपल्यानंतर तिला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, सध्या तिला सोलापुरातील महिला कारागृहात ठेवण्यात आले आहे. तथापि, आता पूजाला जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग खुला झाला आहे. चौकशीसाठी मात्र तिला पोलिसांसमोर हजर राहावे लागणार आहे.
पूजा गायकवाड ही नर्तिका गोविंद कला केंद्राशी जोडलेली होती. बर्गे तिच्या नृत्याच्या कार्यक्रमाला गेले आणि त्यांच्यात ओळख झाली. गेल्या दीड वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते. या काळात पूजाने गोविंदकडून सोनं, चांदीचे दागिने, दोन लाखांचा मोबाईल अशी अनेक महागडी भेटवस्तू घेतली होती. (Govind Barge Death Case)
मात्र, पूजाने नंतर गोविंदचे गेवराईतील घर आपल्या नावावर करण्याची मागणी केली. बर्गे यांनी नकार दिल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढले. एवढंच नव्हे तर पूजाने बर्गे यांना बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचंही पोलिस तपासात उघड झालं आहे. यामुळे बर्गे मानसिक तणावाखाली गेले आणि त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, अशी शंका तपासात व्यक्त केली जात आहे.
पुढील तपासाची दिशा :
पोलिसांकडे आता डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि जबाब उपलब्ध असून, या प्रकरणातील चौकशी अधिक गतीमान झाली आहे. कोर्टात सादर केलेल्या या पुराव्यांनंतर प्रकरणात पुढील सुनावणी महत्वाची ठरणार आहे.






