BMC Election 2026 | मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 65 जागांवर विजय मिळवणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच तब्बल 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती होणार आहे. 2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत पारित झालेल्या कायद्यानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्यात आली होती. त्या निर्णयानंतर ही पहिलीच महापालिका निवडणूक होत असल्याने आता या तरतुदीची अंमलबजावणी मुंबईत होणार आहे.
मुंबई महापालिकेत (Mumbai Mahapalika) एकूण 227 निवडून आलेले नगरसेवक असून भाजपकडे (BJP) सर्वाधिक 89 नगरसेवक आहेत. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक आहेत. त्यामुळे दहा स्वीकृत नगरसेवकांपैकी किमान चार भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी उबाठा गटालाही लक्षणीय संख्येत स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता असून त्यामुळे त्यांच्या पक्षाची सभागृहातील ताकद आणखी वाढणार आहे.
स्वीकृत नगरसेवकांमुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल :
स्वीकृत नगरसेवक हे थेट जनतेतून निवडून येत नसले तरी सभागृहातील राजकीय समतोल राखण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. निवडणुकीत तिकीट न मिळालेले, कमी फरकाने पराभूत झालेले किंवा संघटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे नेते यांना या पदावर संधी दिली जाते. त्यामुळे पक्ष संघटना मजबूत ठेवण्यासोबतच अनुभवी नेतृत्वालाही महापालिका कामकाजात पुन्हा सक्रिय ठेवण्याचा हा मार्ग मानला जातो.
यामुळे मुंबई महापालिकेतील सत्तासमीकरणांवर अप्रत्यक्ष परिणाम होण्याची शक्यता आहे. भाजपनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सर्वाधिक स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना तसेच काँग्रेसलाही या माध्यमातून सभागृहात अतिरिक्त ताकद मिळू शकते. त्यामुळे येत्या काळात महापालिकेतील राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. (BMC Election 2026)
BMC Election 2026 | कायद्यातील बदलांची पहिली अंमलबजावणी, इतर महापालिकांनाही फायदा :
मुंबई महापालिकेत नगरसेवकांची एकूण संख्या 227 असून 2023 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत पारित झालेल्या विधेयकानुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून दहा करण्यात आली होती. या कायद्याची अंमलबजावणी आता पहिल्यांदाच मुंबई महापालिकेत होत असून राज्यातील इतर महापालिकांमध्येही 10 स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय गणितांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नाशिक महापालिकेतही (Nashik Mahapalika) स्वीकृत नगरसेवक पदासाठी लॉबिंग सुरू झाले आहे. विविध पक्षांकडून या पदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असून भाजप, शिवसेना शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. काही ठिकाणी दहा नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक या प्रमाणानुसार तर काही ठिकाणी 15 नगरसेवकांमागे एक या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
स्वीकृत नगरसेवक (Swikrut Nagarsevak) म्हणजे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील विशेष सदस्य असतो. शहराच्या विकासात योगदान देणाऱ्या अनुभवी व्यक्तींना ही संधी दिली जाते. प्रशासकीय, कायदेशीर, आरोग्य, अभियांत्रिकी, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांचा यात समावेश केला जातो. हे सदस्य सभागृहातील चर्चेत सहभागी होऊ शकतात आणि विविध समित्यांमध्ये काम करू शकतात, मात्र महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समिती निवडणुकीत त्यांना मतदानाचा अधिकार नसतो.






