Gold Rate | लग्नसराईच्या तोंडावर सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेली घसरण आजही कायम आहे. आज, गुरुवार (३० ऑक्टोबर), सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावात मोठी घट नोंदवण्यात आली आहे, ज्यामुळे विक्रमी उच्चांकावरून दर लक्षणीयरीत्या खाली आले आहेत.
उच्चांकावरून मोठी घसरण :
आजच्या सत्रात सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १,३७५ रुपयांची घट झाली, तर चांदी प्रति किलो १,०३३ रुपयांनी स्वस्त झाली. ही घसरण लग्न खरेदी करणाऱ्यांसाठी एक दिलासा मानली जात आहे, कारण दर विक्रमी पातळीवरून खाली येत आहेत.
सोन्याचे भाव १७ ऑक्टोबर रोजी गाठलेल्या सर्वकालीन उच्चांकापासून आतापर्यंत ११,६२१ रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीच्या दरातही मोठी पडझड झाली असून, ती १४ ऑक्टोबरच्या उच्चांकावरून ३२,५०० रुपये प्रति किलोने स्वस्त झाली आहे.
Gold Rate | आजचे कॅरेटनुसार दर (GST सह) :
आजच्या घसरणीनंतर, जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२२,८३० रुपये (प्रति १० ग्रॅम) झाला आहे. २३ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर १,२२,३३८ रुपये, २२ कॅरेटचा भाव १,१२,५१३ रुपये, आणि १८ कॅरेटचा दर ९२,१२३ रुपये (मेकिंग चार्ज वगळून) झाला आहे. जीएसटीसह चांदीचा दर १,४९,९६८ रुपये प्रति किलोवर आला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २९ ऑक्टोबरला जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोने १,२०,६२८ रुपयांवर बंद झाले होते, जे आज सकाळी १,१९,२५३ रुपयांवर उघडले. या घसरणीनंतरही, या वर्षात सोने ४३,५१३ रुपयांनी आणि चांदी ५९,५८३ रुपयांनी महाग आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यातही घसरण होऊनही सोन्यात ३,९०४ रुपयांची वाढ कायम आहे.






