Gokul Milk Rate Hike | कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजेच ‘गोकुळ’ यांनी दुधाच्या खरेदी दरात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरपासून म्हैस आणि गायीच्या दुधाच्या खरेदी दरात प्रतिलीटर 1 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे दुध उत्पादकांना दर महिन्याला साडेचार ते पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त फायदा होणार आहे. मात्र, दुधाच्या विक्री दरात सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (Gokul Milk Rate Hike)
गाय आणि म्हैस दुधाच्या खरेदी दरात वाढ :
गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले की, दूध उत्पादकांना आर्थिक आधार मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 सप्टेंबरपासून जिल्ह्यातील म्हैस दुधाचा 6.0 फॅट आणि 9.0 एसएनएफसाठी खरेदी दर 50.50 रुपयांवरून 51.50 रुपये प्रतिलीटर करण्यात आला आहे. तसेच 6.5 फॅट आणि 9.0 एसएनएफ असलेल्या म्हैस दुधाचा दर 54.80 रुपयांवरून 55.80 रुपये प्रतिलीटर करण्यात आला आहे. गायीच्या दुधाचा 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफसाठी दर 32 रुपयांवरून 33 रुपये प्रतिलीटर करण्यात आला आहे.
याशिवाय संघाने दूध संस्था, कर्मचारी आणि लहान उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या विविध योजनांमध्येही सुधारणा केल्या आहेत.
सर्वसामान्यांना फटका! दुधाच्या किमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
महागाईमुळे बांधकाम खर्च वाढल्याने, प्राथमिक दूध संस्थांना दिल्या जाणाऱ्या इमारत अनुदानात 8 ते 10 हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय गोकुळने घेतला आहे. तसेच दूध संस्था कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहनातही वाढ करण्यात आली असून, पगारावर दिला जाणारा अतिरिक्त दर 0.65 पैशांवरून 0.70 पैसे प्रतिलीटर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे संघावर वार्षिक जवळपास 3 कोटी रुपयांचा आर्थिक भार येणार आहे. (Gokul Milk Rate Hike)
पूर्वी 5 जनावरे असलेल्या गोठ्यांनाच अनुदान मिळत होते. मात्र आता किमान 4 जनावरे असलेल्या मुक्त गोठ्यांनाही अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे लहान दूध उत्पादकांनाही या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
सध्या गोकुळ दूध संघ जिल्ह्यातील आणि बाहेरील सुमारे 7,500 प्राथमिक दूध संस्थांच्या माध्यमातून दररोज 16 लाख लिटर दूध संकलित करतो. “दूध उत्पादकांचे हित जपणे हेच आमचे ध्येय असून त्यांच्या मेहनतीला योग्य मूल्य मिळवून देण्यासाठी गोकुळ कायम कटिबद्ध राहील,” असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.






