Girish Mahajan | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकीय संघर्ष आता चिघळलेला दिसतो आहे. महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी महाजन यांच्यावर केला होता. या आरोपांवर आता गिरीश महाजन यांनी थेट प्रत्युत्तर देत खडसेंना खुलं आव्हान दिलं आहे.
महाजन यांचा संताप
गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, “मी जर खडसेंविषयी एक गोष्ट सांगितली, तर ते घराबाहेरही पडू शकणार नाहीत. लोक त्यांना जोड्याने मारतील. मी इतका खालचं वागणार नाही. पण त्यांनी जर अजून काही बोललं, तर मला तोंड उघडावं लागेल. घरातील गोष्ट आहे, पण मी ती गुप्त ठेवतोय.”
त्यांनी पुढे ठणकावून सांगितलं, “फक्त बडबड करून चालणार नाही, एक पुरावा द्या. जर काही तथ्य असेल तर दाखवा. त्यांनी कुणाला पुरावे दिले म्हणताहेत, पण ते कुठे आहेत? खोटं बोलताना लाज वाटायला हवी.”
महाजन यांचा सुर अधिक आक्रमक होत, त्यांनी असा इशारा दिला की, “मी जर एक सत्य बाहेर आणलं, तर खडसेंना तोंड काळं करून बाहेर पडावं लागेल. अजूनही मी संयम बाळगतोय. मला बोलायला लावू नका. तुमचं सत्य बाहेर आलं, तर सगळं स्पष्ट होईल.”
खडसे यांनी काय आरोप केले?
एका पत्रकाराच्या हवाल्याने खडसे यांनी दावा केला की, “गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत. याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आहे. शाह यांनी स्वतः एका बैठकीत महाजन यांना त्याबाबत विचारले होते.” खडसेंच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला.
दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महाजन यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देत म्हटलं की, “पूर्ण चौकशी करूनच गिरीश महाजन यांना मंत्रिपद देण्यात आलं आहे. खडसेंकडून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होतोय.”






