Ghanshyam Darwade | बिग बॉस मराठी फेम छोटा पुढारी घनःश्याम दरवडे (Ghanshyam Darwade) याने आपल्या आरोग्याविषयी मोठं आणि भावनिक वक्तव्य दिलं आहे. ‘मला जन्मापासूनच लिव्हर, किडनी आणि फुफ्फुसांचा त्रास आहे,’ असं सांगताना त्याचे डोळे पाणावले. बालपणापासूनच सुरू झालेला हा संघर्ष त्याने किती हिमतीनं पार केला, हे त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होतं.
सध्या सोशल मीडियावर ‘घनःश्याम दरवडे मृत्यू पावला’ अशा अफवांनी खळबळ उडवली होती. पण प्रत्यक्षात तो ठणठणीत असून, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या आरोग्याच्या गंभीर स्थितीबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लिव्हर, किडनी आणि फुफ्फुसांच्या समस्या, थायरॉईड आणि आनुवंशिक आजार या सगळ्यांशी लहानपणापासून तो झुंज देतो आहे.
‘सहा वर्षांपर्यंत हॉस्पिटलमध्येच होतो’; उंचीमुळे लोकांनी डावललं :
घनःश्याम दरवडेने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “माझं संपूर्ण बालपण हॉस्पिटलमध्ये गेलं. सहा वर्षांचा होईपर्यंत मी घरी नव्हतोच. जन्मत:च माझ्या शरीरात काही त्रास होता – लिव्हर, किडनी आणि फुफ्फुसं नीट काम करत नव्हती.”
तो पुढे म्हणतो, “गावी मला उंची कमी असल्यामुळे सतत टोमणे मारले जायचे. लोकांनी मला डावललं, पण माझ्या आई-वडिलांनी मला कधीही साथ सोडली नाही. आज मी जे काही आहे, ते त्यांच्या प्रेमामुळे आणि साथीनं आहे.” सातवीत असताना त्याला आपल्या आजारपणाची जाणीव झाली. तो डॉक्टरांकडे गेला आणि त्यावेळी त्याला आनुवंशिक त्रास, थायरॉईड, फुफ्फुसांची सूज, लिव्हरची समस्या आणि रक्त तयार न होण्याचा त्रास असल्याचं सांगण्यात आलं. (Ghanshyam Darwade)
Ghanshyam Darwade | ‘आजही इंजेक्शन घेतो…’; जीवसाठवण्यासाठी सतत उपचारांची गरज :
आजही घनःश्याम दरवडे दर आठवड्याला इंजेक्शन घेतो. त्याचं रक्त आपोआप तयार होत नाही, त्यामुळे रक्त शुद्ध करण्यासाठी नियमित उपचार घ्यावे लागतात. “माझ्या किडनीमध्ये क्रिएटीनचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे तीही धोकादायक स्थितीत आहे,” असं त्यानं सांगितलं. एवढ्या शारीरिक अडचणी असूनही घनःश्याम दरवडे नेहमी हसतमुख आणि सकारात्मक असतो.
त्याच्या या संघर्षमय जीवनातली ही कहाणी केवळ प्रेरणादायकच नाही, तर समाजाला देखील एक मोठा संदेश देणारी आहे. आजारी असतानाही स्वबळावर यश मिळवणाऱ्या व्यक्तींचं जीवन हे खरं ‘हिरो’चं उदाहरण असतं, हे घनःश्यामने दाखवून दिलं आहे.






