Pune News l शहरात गेल्या काही दिवसांपासून गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ही बाब चिंताजनक असून, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी पुण्यात आढावा बैठक घेतली.
बैठकीत आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील ८० टक्के जीबीएस रुग्ण हे सिंहगड रस्ता, किरकटवाडी, खडकवासला, नांदे, नांदेड सिटी या परिसरातील आहेत. दूषित पाण्यामुळे बहुतांश रुग्णांना हा आजार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काही रुग्णांना पाणीपुरीच्या दूषित पाण्यामुळे त्रास झाल्याचे समोर आले आहे.
दूषित पाण्याची समस्या सोडवण्यावर भर :
आबिटकर यांनी बैठकीत दूषित पाण्याची समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. सिंहगड रस्ता परिसरात नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. येत्या दोन-तीन दिवसांत याचे परिणाम दिसून येतील, असेही त्यांनी सांगितले.
खासगी रुग्णालयांनाही सूचना :
आबिटकर यांनी खासगी रुग्णालयांनाही जीबीएस रुग्णांची माहिती वेळेवर देण्याच्या सूचना दिल्या. करोना काळात खासगी रुग्णालयांकडून वेळेत माहिती मिळत होती, परंतु आता तसे होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. खासगी रुग्णालयांची माहिती घेण्यासाठी दोन्ही महापालिकांनी अधिकारी नेमावेत, असेही त्यांनी सुचवले.
दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनाला (FDA) सिंहगड रस्ता परिसरातील हॉटेल आणि अन्नपदार्थांची तातडीने तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
News Title : GBS Cases on the Rise in Pune; Health Minister’s Meeting Focuses on Contaminated Water and Solutions






