CNG PNG Price Drop | नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इंधन दरांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, 1 जानेवारी 2026 पासून काही इंधनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा थेट फायदा घरगुती ग्राहकांसह वाहनधारकांनाही होणार आहे. (CNG PNG Price cut)
पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस रेग्युलेटरी बोर्डाने (PNGRB) देशभरातील गॅस ग्राहकांसाठी नवीन टॅरिफ रचना जाहीर केली आहे. या बदलामुळे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि पाईपद्वारे घरगुती वापरासाठी मिळणाऱ्या नॅचरल गॅसच्या (PNG) दरात कपात होणार आहे. परिणामी, महिन्याच्या खर्चात लक्षणीय बचत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
1 जानेवारीपासून नवीन दर लागू :
PNGRB कडून जाहीर करण्यात आलेली ‘युनिफाईड टॅरिफ स्ट्रक्चर’ 1 जानेवारी 2026 पासून देशभर लागू होणार आहे. या नव्या रचनेमुळे CNG आणि PNG ग्राहकांना प्रति युनिट सरासरी 2 ते 3 रुपयांची थेट बचत होणार आहे. गॅस वाहतुकीसाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी केल्यामुळे हा फायदा अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे.
PNGRB चे सदस्य ए. के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचतो की नाही, यावर बोर्डाकडून सातत्याने लक्ष ठेवले जाणार आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच हा बदल लागू होणार असल्याने CNG वाहनचालक आणि PNG वापरणाऱ्या कुटुंबांसाठी ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
CNG PNG Price Drop | संपूर्ण देशात लागू; लाखो ग्राहकांना फायदा :
हा निर्णय संपूर्ण भारतभर लागू होणार असून, देशातील 40 शहर गॅस वितरण कंपन्यांच्या 312 भौगोलिक क्षेत्रांतील ग्राहकांना याचा थेट लाभ मिळणार आहे. यापूर्वी अंतरावर आधारित तीन झोनची टॅरिफ प्रणाली होती, ज्यामुळे काही भागांतील ग्राहकांवर अधिक आर्थिक भार पडत होता.
आता झोनची संख्या तीनवरून दोन करण्यात आली असून, झोन-1 अंतर्गत देशभरातील CNG आणि घरगुती PNG ग्राहकांसाठी 54 रुपयांचा टॅरिफ निश्चित करण्यात आला आहे. याआधी हा टॅरिफ 80 ते 107 रुपयांपर्यंत होता. त्यामुळे स्वयंपाकासाठी PNG वापरणाऱ्या कुटुंबांचा तसेच CNG वाहनचालकांचा मासिक खर्च कमी होणार आहे. (CNG PNG Price Drop)
दरम्यान, नैसर्गिक गॅस अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावरही भर देण्यात येत आहे. PNGRB च्या या निर्णयामुळे गॅस वापराला चालना मिळेल आणि महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






