Pune News | जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) शहरातील महिला प्रवाशांसाठी विशेष उपक्रम जाहीर केला आहे. आज म्हणजेच ८ मार्च रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात धावणाऱ्या काही निवडक बसमार्गांवर महिलांना दिवसभर मोफत प्रवासाची सुविधा देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शहरातील हजारो महिला प्रवाशांना दिलासा मिळणार असून सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (PMPML free bus service women)
३१ मार्गांवर महिलांसाठी मोफत सेवा :
महिला दिनानिमित्त PMPML ने शहरातील एकूण ३१ बसमार्गांवर धावणाऱ्या महिला विशेष बसमध्ये तिकिटाशिवाय प्रवासाची सुविधा दिली आहे. या उपक्रमाचा लाभ पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) हद्दीतील महिला प्रवाशांना होणार आहे.
या मार्गांमध्ये स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर, मनपा भवन ते वडगाव शेरी, कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन, एनडीए गेट क्रमांक १० ते मनपा भवन आणि कात्रज ते शिवाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांचा समावेश आहे. तसेच कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, धनकवडी ते न.ता. वाडी, कात्रज ते कोथरूड डेपो, हडपसर गाडीतळ ते वारजे माळवाडी आणि भेकराईनगर ते मनपा भवन या मार्गांवरही महिलांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे.
याशिवाय काही लांब पल्ल्याच्या मार्गांवरही ही सवलत लागू करण्यात आली आहे. हडपसर ते निगडी भक्ती-शक्ती, हडपसर ते कात्रज, स्वारगेट ते हडपसर गाडीतळ, हडपसर ते मांजरी बु. आणि मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव या मार्गांवर महिलांना मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे. तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्थानक ते शिवाजीनगर आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्थानक ते पुणे स्टेशन या मार्गांवरही ही सुविधा उपलब्ध असेल.
तसेच पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द, मनपा भवन ते मुकाई चौक किवळे, निगडी ते मेगापॉलिस हिंजवडी, मनपा भवन ते भोसरी आणि भोसरी ते हिंजवडी माण फेज ३ अशा मार्गांवरही महिला प्रवासी तिकिटाशिवाय प्रवास करू शकतील. शहराच्या विविध भागांना जोडणाऱ्या या मार्गांमुळे मोठ्या संख्येने महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
पुणे मेट्रोकडूनही महिलांसाठी सुविधा
दरम्यान, महा मेट्रोकडूनही महिला दिनाच्या निमित्ताने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोच्या प्रत्येक डब्यात महिलांसाठी स्वतंत्र राखीव जागा ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासोबतच ज्येष्ठ नागरिकांसाठीही काही जागा आरक्षित करण्यात येणार आहेत. (Pune women free bus travel)
या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतुकीमध्ये महिलांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. महिला प्रवाशांनीही या उपक्रमाचे स्वागत केले असून महिला दिनानिमित्त दिलेली ही सुविधा शहरातील महिलांसाठी विशेष भेट ठरली आहे.






