भंडाऱ्यात चोरीच्या संशयावरून चौघांना बेदम मारहाण; युवकाचा मृत्यू

On: April 15, 2025 7:46 PM
Crime News
---Advertisement---

Bhandara News | भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पहेला या गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शनिवारी मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. चोरीच्या संशयावरून गावकऱ्यांनी चार जणांना जबर मारहाण केली आहे. यात एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून उर्वरित तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

चोर असल्याच्या संशयावरून चौघांवर मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव (Bhandara News) मोहम्मद मुबारक सय्यद (वय २२) असून, जखमींपैकी पृथ्वीराज खंगार (वय ३५), धनराम टेकाम (वय ४०) आणि मोहम्मदची आई रज्जू सय्यद (वय ५५) यांचा समावेश आहे. मोहम्मद आणि त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तींवर गावातील काही लोकांनी चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय घेतला. त्यानंतर सुमारे २० ते २५ गावकऱ्यांनी मध्यरात्री त्यांच्या राहत्या घरी घुसून चौघांना बेदम मारहाण केली आहे.

एकाचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

मारहाणीदरम्यान मोहम्मदच्या आईने हस्तक्षेप करून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिलाही दगड (Bhandara News) व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील मोहम्मद याचा उपचारादरम्यान नागपूरमध्ये मृत्यू झाला आहे. रज्जू सय्यद यांच्यावर नागपुरात तर उर्वरित दोन जणांवर भंडाऱ्यात उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर अड्याळ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच संशयितांना ताब्यात घेतलं असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असून सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

या घटनेमुळे संपूर्ण अड्याळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी ग्रामस्थांना अफवा पसरणार नाही यासाठी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.  या घटनेमुळे जिल्हाभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नागरिकांनी कायदा हातात न घेता पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवावा, असं आवाहन करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Title : Four beaten on suspicion of theft in Bhandara news

Join WhatsApp Group

Join Now