Joe Biden Health | अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरने ग्रासल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८२ वर्षीय जो बायडेन यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. त्यांना मूत्रविषयक समस्या जाणवत असल्याने वैद्यकीय सल्ला घेतला गेला. तपासणीनंतर डॉक्टरांनी प्रोस्टेट कॅन्सरचं निदान केलं असून, हा आजार त्यांच्या हाडांपर्यंत पसरल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे.
ही बातमी सार्वजनिक झाल्यानंतर जगभरातून प्रतिक्रिया उमटत असून, राजकीय प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांनीही यावर दुःख व्यक्त केलं आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटलं, “मी आणि मेलानिया जो बायडेन यांच्या वैद्यकीय अहवालाने दुःखी झालो आहोत. त्यांना लवकर बरे वाटो, हीच प्रार्थना.” या वक्तव्यानंतर बायडेन-ट्रम्प यांच्यातील वैयक्तिक संबंधांविषयी चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय? पुरुषांमध्ये धोकादायक आजार :
जो बायडेन यांना झालेला प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये होणारा एक गंभीर प्रकारचा कर्करोग आहे. हा आजार मूत्राशयाच्या खाली असणाऱ्या प्रोस्टेट ग्रंथीपासून सुरू होतो. ही ग्रंथी वीर्य निर्मितीसाठी महत्त्वाची असते. प्रारंभी हा कॅन्सर हळूहळू वाढतो, पण काही वेळा तो आक्रमक रूप घेतो आणि हाडांपर्यंत पसरतो.
या कॅन्सरची लक्षणे सुरुवातीला फारशी जाणवत नाहीत, पण एकदा आजार वाढला की मूत्रविसर्जन करताना अडथळा, मूत्र किंवा वीर्यामध्ये रक्त येणे, पाठीच्या खालच्या भागात किंवा छातीत वेदना जाणवणे, आणि लैंगिक दुर्बलता यासारखी लक्षणं दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये अचानक वजन कमी होणे, भूक न लागणे आणि बद्धकोष्ठता देखील दिसून येते.
Joe Biden Health | उपचार कोणते? बायडेन कुटुंबीय करत आहेत विचार :
जो बायडेन यांचे कुटुंब सध्या विविध वैद्यकीय पर्यायांवर विचार करत आहेत. कॅन्सर हाडांपर्यंत पसरल्याने उपचार प्रक्रिया गुंतागुंतीची होणार असून, बायडेन यांची प्रकृती काळजीचा विषय बनली आहे. अमेरिकन राजकारणावर मोठा प्रभाव असलेल्या या नेत्याच्या प्रकृतीसंबंधी पुढील अपडेट्सकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






