Dr. Sampada Munde | साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉ. संपदा मुंडे असे मृत डॉक्टरचे नाव असून, त्यांनी काल रात्री गळफास घेऊन जीवन संपवलं. या घटनेमुळे फलटण शहरासह संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. वरिष्ठांकडून दुर्लक्ष झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे गेल्या काही महिन्यांपासून तणावात होत्या. फलटण शहरातील एका हॉटेलमध्ये त्यांनी आत्महत्या केली. पोलिस आणि आरोग्य विभागातील वाद, तसेच अंतर्गत चौकशी यामुळे त्यांच्यावर मानसिक ताण वाढला होता. या प्रकरणी फलटण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांकडे केलेली तक्रार दुर्लक्षित? :
माहितीनुसार, डॉ. संपदा मुंडे यांनी आपल्या वरिष्ठांकडे लेखी तक्रार देत अन्याय होत असल्याचं नमूद केलं होतं. त्यांनी आत्महत्येचा इशाराही दिला होता, मात्र तरीही त्यांच्या तक्रारीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे. या दुर्लक्षामुळे अखेर त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं.
दरम्यान, पोलिस PSI गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिस आणि आरोग्य विभागातील मतभेदांमुळे गेल्या काही काळात डॉ. मुंडे तणावात होत्या. त्याचाच शेवट या दुर्दैवी घटनेत झाला आहे.
Dr. Sampada Munde | वैद्यकीय क्षेत्रात चिंता आणि संताप :
या घटनेनंतर फलटणसह सातारा जिल्ह्यातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप वैद्यकीय संघटनांकडून करण्यात आला आहे. कामाचा ताण, वरिष्ठांचा दबाव आणि चौकशा यामुळे डॉक्टर आणि परिचारिका गंभीर तणावाखाली असल्याचं संघटनांचं म्हणणं आहे.
डॉ. संपदा मुंडे यांच्या निधनानंतर वैद्यकीय संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया :
या घटनेवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. “जर विभागात काम करणाऱ्या महिला डॉक्टर आणि पोलिसही सुरक्षित नसतील तर गृहखात्याकडून काय अपेक्षा करायची?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, “तीन महिन्यांपासून तिला त्रास दिला जात होता, पण कोणी ऐकलं नाही. आता तपास करून काय उपयोग? एक जीव गेला.”
सुषमा अंधारे यांनी सांगितलं की, अशा अनेक प्रकरणांची माहिती त्यांच्या निदर्शनास आली आहे. पुणे, ठाणे आणि मुंबईतील महिला कर्मचाऱ्यांनाही अशाच प्रकारचा त्रास दिला जातो. त्यामुळे सरकारने तत्काळ कारवाई करून महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस धोरण आणावं, अशी मागणी त्यांनी केली.






