Anunay Sood | दुबईतील (Dubai) प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर (Travel Influencer) आणि फोटोग्राफर अनुनय सूद (Anunay Sood) याचे वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी निधन झाले. त्याच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने सोशल मीडियावर सर्वांनाच धक्का बसला आहे. अनुनयच्या कुटुंबीयांनी इंस्टाग्रामवर (Instagram) पोस्ट करून या वृत्ताला दुजोरा दिला, मात्र मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अनुनय सूदचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, अनुनय सूद सध्या अमेरिकेतील (America) लास वेगास (Las Vegas) येथे होता आणि तिथूनच त्याने आपली शेवटची पोस्ट शेअर केली होती. अनुनय सूदची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट काही दिवसांपूर्वीची आहे, ज्यामध्ये तो लास वेगासच्या रस्त्यावर स्पोर्ट्स कारच्या (Sports Cars) मध्ये उभा दिसतो. “विश्वास बसत नाही की मी हा वीकेंड माझ्या स्वप्नातील मशीन्स आणि दिग्गजांसोबत घालवला,” असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते. ही पोस्ट आता त्याच्या चाहत्यांसाठी एक शेवटची आठवण ठरली आहे.
दुबईमध्ये (Dubai) राहणारा अनुनय सूद हा केवळ एक ट्रॅव्हलर नव्हता, तर लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान होता. त्याच्या इंस्टाग्रामवर १४ लाखांहून अधिक फॉलोअर्स (Instagram Followers) होते, तर यूट्यूबवर (YouTube) सुमारे चार लाख सबस्क्राइबर्स होते. त्याच्या रील्स (Reels) आणि फोटोग्राफीने (Photography) सोशल मीडियावरील ट्रॅव्हल कंटेंटला नवी ओळख दिली होती. स्वित्झर्लंडच्या (Switzerland) पर्वतरांगांपासून ते आइसलँडच्या (Iceland) निसर्गापर्यंत, त्याच्या कॅमेऱ्याने जगाच्या कानाकोपऱ्यातील सौंदर्य टिपले होते.
अनुनयची लोकप्रियता इतकी होती की, तो सलग तीन वर्षे (२०२२, २०२३ आणि २०२४) ‘फोर्ब्स इंडिया’च्या (Forbes India) टॉप १०० डिजिटल स्टार्सच्या (Top 100 Digital Stars) यादीत समाविष्ट झाला होता. फोर्ब्सने “दुबईस्थित फोटोग्राफर जो जगाला आपल्या कॅमेऱ्यातून पाहतो,” अशा शब्दांत त्याचा गौरव केला होता. अनुनय एक यशस्वी मार्केटिंग फर्म देखील चालवत होता.
शेवटची पोस्ट चर्चेत
त्याच्या कुटुंबीयांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत या कठीण काळात सर्वांनी गोपनीयतेचा (Privacy) आदर करावा, अशी विनंती केली आहे. या बातमीनंतर चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये श्रद्धांजली वाहत दुःख व्यक्त केले आहे. अनुनयने त्यांना आयुष्य भरभरून जगण्याची प्रेरणा दिल्याचे अनेकांनी म्हटले आहे. अनुनयने एकदा म्हटले होते, “जर माझ्या कॅमेऱ्यामुळे एका जरी व्यक्तीला जग पाहण्याची प्रेरणा मिळाली, तर माझे काम सफल झाले.” त्याचे हेच शब्द आज त्याच्या आठवणींना अधिक गहिरे करत आहेत.






