Crime News | जळगाव शहरापासून अवघ्या ३-४ किलोमीटर अंतरावर असलेल्या ममुराबाद रोडवर एक मोठी कारवाई करण्यात आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचे निकटवर्तीय, माजी महापौर ललित कोल्हे (Lalit kolhe) यांच्या मालकीच्या फॉर्महाऊसवर चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.
विदेशी नागरिकांची फसवणूक :
याठिकाणी छापा टाकून शिवसेना (शिंदे गट) नेते ललित कोल्हे यांच्यासह एकूण ८ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ललित कोल्हे (Lalit kolhe) यांचेच हे कॉल सेंटर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या कॉल सेंटरमधून मुख्यतः विदेशी नागरिकांना लक्ष्य केले जात होते. विविध ऑनलाइन कंपन्यांचे एजंट असल्याचे भासवून, त्यांच्याशी संपर्क साधून वेगवेगळ्या मार्गांनी त्यांची लाखोंची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते ललित कोल्हे यांच्या मालकीचे हे फॉर्महाऊस आहे.
Crime News | परराज्यांतील तरुण कामावर :
कोलकाता आणि इतर राज्यांतील तरुण येथे पगारावर काम करत होते. सुमारे २० दिवसांपूर्वी हे सेटअप सुरू झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती मिळताच एका विशेष पथकाने एल. के. (L.K.) नावाच्या फॉर्महाऊसवर छापा टाकला घटनास्थळावरून ३१ लॅपटॉप जप्त करण्यात आले. ही कॉलिंग मुख्यत्वे रात्री केली जात. छाप्यात 2 सिस्टिम्स ओपन अवस्थेत मिळाल्या ज्यातून रात्री परदेशी कॉल्स होत असल्याचे समोर आले.
विविध कंपन्यांचे एजंट असल्याचे भासवून परदेशी नागरिकांकडून पैसे ट्रान्सफर केले जात असल्याचा उलगडा झाला आहे. बाकी सिस्टिम्स बंद असल्याने त्यांची माहिती अद्याप मिळालेली नाही, मात्र सर्व लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक यांनी दिली.
कारवाईच्या वेळी घटनास्थळी ४ संशयित तरुण आढळले, जे कोलकात्याचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या चौकशीतून या सेंटरमध्ये २० ते २५ जण कार्यरत असल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य हॅण्डलर मुंबईतून काम करत असल्याची महत्त्वपूर्ण माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे, असे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी सांगितले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
News title : Fake call center at the farmhouse of Minister Gulabrao Patil’s close aide, former mayor; Shocking revelation in police action






