Satara Suicide Case | सातारा (Satara) जिल्ह्यातील फलटण (Phaltan) येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले असून, या संवेदनशील प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे.
भगिनीला न्याय मिळणारच
फलटण दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी डॉ. संपदा मुंडे यांच्या दुर्दैवी आत्महत्येबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “आमची एक लहान भगिनी, जी डॉक्टर होती, तिचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला. तिने आत्महत्येपूर्वी त्याचे कारणही हातावर लिहून ठेवले,” असे ते म्हणाले. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करून आरोपींना अटक केल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणातील संपूर्ण सत्य बाहेर येत असून, कोणत्याही परिस्थितीत आमच्या या भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा ठाम निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू असून, सत्य समोर आणले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने (Gopal Badne) आणि पोलीस कर्मचारी प्रशांत बनकर (Prashant Bankar) यांना अटक करण्यात आली आहे.
प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न निंदनीय
या घटनेनंतर काही जणांकडून या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा निंदनीय प्रयत्न होत असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. काहीही कारण नसताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalkar) आणि सचिनदादांचे (Sachindada) नाव यात गोवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला.
“या महाराष्ट्राला देवाभाऊ (देवेंद्र फडणवीस) माहिती आहे. जर यात एवढीशी जरी शंका असती, तर मी हा कार्यक्रम रद्द करून आलो नसतो,” असे म्हणत त्यांनी निंबाळकरांवरील आरोपांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिले. “अशा गोष्टीत मी पक्ष, व्यक्ती किंवा राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान बहिणीचा विषय आहे, तिथे मी कोणतीही तडजोड करत नाही. पण त्याचवेळी, प्रेताच्या टाळूवरचे लोणी कोणी खात असेल आणि प्रत्येक गोष्टीत राजकीय भूमिका घेत असेल, तर तेही मी सहन करणार नाही,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.






