Extramarital Affairs | विवाह हा विश्वास आणि निष्ठेचा पवित्र बंध मानला जातो. मात्र एका नव्या अहवालानुसार, देशातील अनेक शहरांमध्ये विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. ऑनलाइन डेटिंग प्लॅटफॉर्म Ashley Madison च्या जून 2025 मधील अहवालात या ट्रेंडचा धक्कादायक मागोवा घेतला असून, कांचीपुरम हे शहर अव्वल ठरले आहे. उल्लेखनीय म्हणजे, गेल्या वर्षी 17व्या क्रमांकावर असलेले कांचीपुरम यंदा थेट पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.
या यादीत दिल्ली-एनसीआरचे तब्बल नऊ जिल्हे आहेत. सेंट्रल दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, तर गुरुग्राम, नोएडा, गाझियाबाद, साउथ वेस्ट, ईस्ट, साउथ, वेस्ट आणि नॉर्थ-वेस्ट दिल्ली हे जिल्हे ‘टॉप 20’ मध्ये आहेत. तर पुणे आठव्या, बेंगळुरू नवव्या आणि साउथ दिल्ली दहाव्या क्रमांकावर आहेत. (Extramarital Affairs in India 2025)
अहवालानुसार टॉप 10 ?
अहवालानुसार टॉप 10 क्रमवारीत 1) कांचीपुरम, 2) सेंट्रल दिल्ली, 3) गुरुग्राम, 4) नोएडा, 5) साउथ वेस्ट दिल्ली, 6) देहरादून, 7) ईस्ट दिल्ली, 8) पुणे, 9) बेंगळुरू आणि 10) साउथ दिल्ली अशी नावे आहेत. त्यानंतर 11) चंदीगड, 12) लखनौ, 13) कोलकाता, 14) पश्चिम दिल्ली, 15) कामरूप, 16) उत्तर-पश्चिम दिल्ली, 17) रायगड (छत्तीसगड), 18) हैदराबाद, 19) गाझियाबाद आणि 20) जयपूर या शहरांचा समावेश आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महानगरांतील व्यस्त जीवनशैली, सोशल नेटवर्किंगचा वाढता वापर, कामाचे दीर्घ तास आणि वैवाहिक नात्यातील भावनिक दुरावा या कारणांमुळे वैवाहिक नातेसंबंधांमध्ये बदल दिसत आहेत. काहींना नव्या नात्यांचा ‘थ्रिल’ आणि भावनिक पूर्ततेचा शोध असतो, तर ओटीटीवरील कंटेंटही या संबंधांना सामान्य आणि ग्लॅमरस दाखवत असल्याने अपराधीपणाची भावना कमी होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.
Extramarital Affairs | पुणे आठव्या स्थानी का? :
पुण्यात विद्यार्थ्यांची मोठी संख्या, आयटी-सेवाक्षेत्रातील तरुण व्यावसायिक आणि देशभरातून झालेल्या स्थलांतरामुळे बहुसांस्कृतिक वातावरण निर्माण झाले आहे. वाढती नाइटलाइफ, स्वातंत्र्यपूर्ण सामाजिक मिश्रण आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीमुळे ‘नवे कनेक्शन’ तयार होण्याचा वेग वाढला आहे. परिणामी, काही जण विवाहबाह्य किंवा मुक्त नात्यांकडे आकर्षित होत असल्याचे ट्रेंड विश्लेषकांचे मत आहे. मात्र, हा सर्व समाजाचा चेहरा असा अर्थ नसून, बदलत्या शहरी जीवनशैलीतील काही प्रवृत्तींना हा अहवाल अधोरेखित करतो, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. (Extramarital Affairs in India 2025)
डिजिटल तंत्रज्ञान, सोशल मीडिया आणि खास विवाहितांसाठी डिझाइन केलेली डेटिंग ॲप्स यांद्वारे कनेक्ट होणे सोपे झाले आहे. त्यातच सततची धावपळ, संवादाचा अभाव आणि भावनिक अंतर वाढल्याने वैवाहिक समतोल ढासळू शकतो. अशा परिस्थितीत तज्ज्ञ ‘ओपन कम्युनिकेशन’, समुपदेशन आणि नात्यातील अपेक्षा स्पष्ट ठेवण्याचा सल्ला देतात, जेणेकरून नातेसंबंधांवर ताण कमी राहील.






