पुणे: गिर्यारोहण आणि साहसी क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल एव्हरेस्टवीर कृष्णा ढोकले यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. कृष्णा ढोकले हे पुण्यातील प्रसिद्ध गिरिप्रेमी संस्थेचे एव्हरेस्ट शिखर सर करणारे गिर्यारोहक तसेच गिर्यारोहण मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
कृष्णा ढोकले हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी गावचे सुपुत्र आहेत. ही बातमी गावात पोहोचताच आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गुणवान आणि कर्तृत्ववान गिर्यारोहक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना साहसी क्रीडा प्रकारातील राज्याचा सर्वोच्च आणि मानाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.
हा पुरस्कार कृष्णा ढोकले यांच्या अथक परिश्रम, दृढ निश्चय आणि साहसी वृत्तीचा गौरव आहे. गिरिप्रेमी संस्थेसाठी हा चौथा श्री शिवछत्रपती पुरस्कार आहे. यापूर्वी उमेश झिरपे, आशिष माने आणि जितेंद्र गवारे यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. कृष्णा ढोकले यांचे कार्य युवा पिढीला निश्चितच प्रेरणा देणारे आहे.
राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान
पुरस्कार वितरण सोहळा येत्या १८ एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते कृष्णा ढोकले यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रमुख पाहुणे असणार आहेत.
कृष्णा ढोकले यांनी आजवर सह्याद्री पर्वतरांगेत 140 हून अधिक यशस्वी गिर्यारोहण मोहिमांचे नेतृत्व केले आहे. यासोबतच त्यांनी हिमालयातील 10 महत्त्वाच्या शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. एव्हरेस्ट, कांचनगंगा, किलिमांजारो आणि एल्ब्रस यांसारख्या आंतरराष्ट्रीय शिखरांवर त्यांनी भारताचा तिरंगा फडकवला आहे.
श्री शिवछत्रपती पुरस्कार कोणाला दिला जातो?
श्री शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. हा पुरस्कार विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रदान केला जातो. या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड त्यांच्या मागील वर्षातील उत्कृष्ट क्रीडा प्रदर्शन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील यश, सातत्य आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांसारख्या निकषांवर आधारित असते.
या पुरस्काराच्या माध्यमातून शासनाचा उद्देश राज्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देणे, त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करणे आणि इतरांनाही क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे. विविध क्रीडा प्रकारांमधील खेळाडूंच्या योगदानाला आणि त्यांच्या कठोर परिश्रमाला समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी हा पुरस्कार महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारच्या खेळांचा समावेश असतो. साहसी क्रीडा प्रकारातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देखील हा पुरस्कार दिला जातो, ज्याचा मान कृष्णा ढोकले यांनी पटकावला आहे.






