EPFO Withdrawal | नोकरदार वर्गासाठी भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच (Provident Fund – PF) ही सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक मानली जाते. मात्र अनेक जण गरजेच्या वेळी त्यातून पैसे काढतात. हा निर्णय त्या क्षणी दिलासा देणारा असतो, पण दीर्घकालीन दृष्टीने हा मोठा तोटा ठरू शकतो. PF मधून वेळेआधी पैसे काढल्याने तुमच्या निवृत्ती नियोजनावर (Retirement Planning), व्याजावर आणि कर लाभांवर मोठा परिणाम होतो.
तज्ज्ञांच्या मते, PF हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा आधार आहे आणि त्याला हात लावल्यास भविष्यातील आर्थिक सुरक्षितता धोक्यात येते. चला पाहूया EPFO मधून पैसे काढल्याने होणारे पाच मोठे तोटे कोणते आहेत.
चक्रवाढ व्याजाची ताकद कमी होते :
EPFO मधील सर्वात मोठा फायदा म्हणजे दरवर्षी मिळणारे चक्रवाढ व्याज (Compound Interest). म्हणजे, तुमच्या जमा रकमेवर आणि मागील व्याजावर पुन्हा व्याज मिळत राहते. पण, जर तुम्ही मध्येच पैसे काढले, तर ही ‘व्याजावर व्याज’ चेन तुटते. त्यामुळे दीर्घकाळात मिळणारी एकूण रक्कम मोठ्या प्रमाणात घटते.
उदाहरणार्थ, नियमित गुंतवणूक चालू ठेवल्यास निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम कोट्यवधींच्या आसपास पोहोचू शकते. पण मध्येच रक्कम काढल्यास ती लाखोंमध्येच अडकते.
EPFO Withdrawal | निवृत्ती निधी आणि कर लाभांवर परिणाम :
EPFO चा प्रमुख उद्देश म्हणजे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक आधार देणे हा आहे. मात्र वारंवार पैसे काढल्यास निवृत्तीच्या वेळी मिळणारी रक्कम कमी होते. दर महिन्याला ₹5,000 गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला 25 वर्षांनंतर सुमारे ₹50 लाख मिळू शकतात, पण मध्येच रक्कम काढल्यास ही रक्कम फक्त ₹30 लाखांपर्यंत खाली येते.
तसेच, EPF मधून 5 वर्षांपूर्वी पैसे काढल्यास कर (Tax) लागू होतो. गुंतवणूक, व्याज आणि काढलेली रक्कम करपात्र होते. शिवाय व्याज “Income from Other Sources” मध्ये धरले जाते आणि TDS देखील कापला जाऊ शकतो.
आपत्कालीन निधी म्हणून वापर करणे चूक :
अनेक जण EPFO ला आपत्कालीन निधी (Emergency Fund) म्हणून वापरतात, परंतु त्याचा उद्देश तसा नाही. ही गुंतवणूक दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेसाठी आहे. अल्पकालीन गरजा पूर्ण करण्यासाठी हा निधी वापरू नये. गरज पडल्यास इतर पर्याय संपल्यावरच शेवटचा उपाय म्हणून तो वापरावा, असे आर्थिक सल्लागार सांगतात.
नोकरी आणि पेन्शन लाभांवर परिणाम :
PF खात्यातून पैसे काढल्यास Employee Pension Scheme (EPS) वरही थेट परिणाम होतो. वारंवार खाते बंद करणे किंवा पैसे काढणे म्हणजे तुमची Service History रीसेट होऊ शकते. त्यामुळे निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या पेन्शनची गणना कमी सेवा कालावधीवर होते.
याचा थेट परिणाम भविष्यातील पेन्शन, ग्रॅच्युइटी आणि इतर लाभांवर होतो. म्हणूनच, तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की, PF खात्याला शक्य तितक्या दीर्घ काळासाठी हात न लावणेच योग्य.






