EPFO Tagline Contest | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) तुमच्यासाठी एक अनोखी आणि आकर्षक संधी घेऊन आली आहे. जर तुम्हाला टॅगलाईन तयार करण्यात गती असेल आणि सर्जनशील कल्पना मांडण्याची आवड असेल, तर ईपीएफओची ही स्पर्धा तुमच्यासाठीच आहे. या स्पर्धेत भाग घेऊन तुम्ही तब्बल ₹21,000 रुपयांचे रोख बक्षीस जिंकू शकता.
ईपीएफओने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलद्वारे या स्पर्धेची घोषणा केली असून, “तुमची क्रिएटिव्हिटी दाखवा, टॅगलाईन तयार करा आणि 21,000 रुपयांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका,” असे आवाहन केले आहे. या उपक्रमाद्वारे तरुणांना आणि सामान्य जनतेला संस्थेशी भावनिकपणे जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
स्पर्धेचे नियम आणि अटी, टॅगलाईन हिंदीतच असावी :
ही स्पर्धा सोपी वाटली तरी तिच्या काही महत्त्वाच्या अटी आहेत. ईपीएफओने स्पष्ट केले आहे की टॅगलाईन हिंदी भाषेत असावी आणि ती १० शब्दांपेक्षा अधिक नसावी. प्रत्येक व्यक्ती केवळ एकच एंट्री सबमिट करू शकतो. (EPFO Tagline Contest)
याशिवाय, तुमची टॅगलाईन कोणता संदेश देते हे देखील स्पष्ट करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एआय वापरून तयार केलेल्या टॅगलाईन मान्य केल्या जाणार नाहीत. म्हणजेच, तुम्हाला स्वतःची कल्पकता दाखवावी लागणार आहे.
EPFO Tagline Contest | स्पर्धेची अंतिम तारीख आणि सहभागाची प्रक्रिया :
ही स्पर्धा १ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून ती १० ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहील. म्हणजेच, अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे काहीच तास उरले आहेत.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी http://www.mygov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यानंतर ‘Do / Task’ सेक्शनमध्ये EPFO Tagline Contest निवडा. लॉगिन करून तुमची टॅगलाईन सबमिट करा.
विजेत्यांना मिळणार विशेष सन्मान :
या स्पर्धेतील विजेत्याला केवळ ₹21,000 रुपयांचे रोख बक्षीसच नव्हे, तर दिल्लीतील ईपीएफओ स्थापना दिवस कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळणार आहे. त्याचबरोबर, विजेत्याची टॅगलाईन ईपीएफओच्या प्रमोशनल कॅम्पेनमध्ये अधिकृतपणे वापरली जाऊ शकते.
ही स्पर्धा तरुणांना त्यांची सर्जनशीलता प्रदर्शित करण्याची आणि राष्ट्रीय पातळीवरील संस्थेशी जोडले जाण्याची मोठी संधी देत आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील आपल्या कल्पनांना ओळख मिळवायची असेल, तर उशीर न करता १० ऑक्टोबरपूर्वी अर्ज करा आणि बक्षीस जिंकण्याची संधी साधा!






