सिनेसृष्टीला मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन!

On: June 20, 2025 12:09 PM
vivek lagoo
---Advertisement---

Entertainment News | मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू (Vivek Lagoo) यांचे गुरुवारी (१९ जून २०२५) संध्याकाळी निधन झाले. ते ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री रीमा लागू (Reema Lagoo) यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. त्यांच्या निधनामुळे मराठी कलासृष्टीवर शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार, २० जून) अंत्यसंस्कार होणार आहेत.

लेखन-दिग्दर्शनातून अभिनयाकडे अपघाती प्रवास

विवेक लागू यांचा जन्म पुण्यात (Pune) झाला होता. त्यांना सुरुवातीपासूनच लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती, जी त्यांना मुंबईच्या (Mumbai) नाट्यसृष्टीत घेऊन आली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. ‘चल आटप लवकर’, ‘प्रकरण दुसरं’ आणि ‘सर्वस्वी तुझीच’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले, ज्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले.

संगीताची आवड असूनही, त्यांचा अभिनयाकडे वळण्याचा प्रवास अपघातानेच झाला. विजय मेहता यांच्या अभिनय शिबिरात त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. मुंबईत एक महिना विनामूल्य राहता येणार असल्याच्या विचाराने त्यांनी हे शिबिर जॉईन केले आणि अभिनयाचे धडे गिरवले. पुढे त्यांनी अभिनयातही आपले कौशल्य सिद्ध करत पुरस्कार पटकावले.

कौटुंबिक जीवन आणि गाजलेल्या कलाकृती

विवेक लागू यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ ‘अग्ली’ आणि ‘३१ दिवस’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. याशिवाय, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या.

त्यांचे आणि अभिनेत्री रीमा लागू यांचे लग्न १९७८ साली झाले होते, मात्र काही काळाने ते विभक्त झाले. त्यांची कन्या मृण्मयी लागू या एक प्रसिद्ध लेखिका असून, त्यांनी ‘थप्पड’ आणि ‘स्कूप’ सारख्या गाजलेल्या कलाकृतींचे लेखन केले आहे. अभिनेत्री रीमा लागू यांचे २०१७ मध्ये निधन झाले होते. विवेक लागू यांच्या पार्थिवावर आज मुंबईतील अंधेरी येथील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

News Title – entertainment news Marathi Actor Vivek Lagoo Dies

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now