Emraan Hashmi | बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयशैलीने एक वेगळी छाप सोडणाऱ्या इमरान हाश्मीने अनेक हिट चित्रपट दिले. मात्र, यशाच्या शिखरावर असताना त्याला आयुष्यात एका भीषण प्रसंगाचा सामना करावा लागला. इमरानचा केवळ तीन वर्षांचा मुलगा गंभीर आजाराशी झुंज देत होता आणि याबाबतचा अनुभव त्याने नुकताच शेअर केला.
अचानक समोर आला कॅन्सरचा धक्का-
इमरान हाश्मीने (Emraan Hashmi) रणवीर अलाहाबादिया यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी होताना आपल्या आयुष्यातील अत्यंत भावनिक काळावर प्रकाश टाकला. २०१४ मध्ये इमरानचा मुलगा अयान केवळ तीन वर्षांचा असताना त्याला कॅन्सर असल्याचं निदान झालं. इमरानने सांगितलं की, १३ जानेवारी २०१४ रोजी ते संध्याकाळी ताज हॉटेलमध्ये पिझा खात होते. त्यावेळी अयान आईसोबत लघवीला गेला आणि त्याच्या लघवीतून रक्त आलं. हे कॅन्सरचे पहिले लक्षण ठरले. त्यानंतर अवघ्या तीन तासांत डॉक्टरांकडे गेले असता, कॅन्सरचे निदान झाले आणि लगेचच ऑपरेशन व केमोथेरपीची प्रक्रिया सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला.
View this post on Instagram
इमरान म्हणाला की, त्या क्षणात त्यांच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलली. त्यावेळी अयानचे वय फक्त ३ वर्षे ११ महिने होते. त्याला झालेला हा कॅन्सर प्रामुख्याने चार वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. यानंतर संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन या लढ्याचा सामना केला. पहिल्या सहा महिन्यांत केमोथेरपी आणि त्यानंतर पाच वर्ष सतत उपचार आणि चाचण्या चालू राहिल्या.
पालक म्हणून घेतली जबाबदारी-
इमरानने (Emraan Hashmi) सांगितले की, अयानच्या समोर कोणीही दु:ख व्यक्त केलं नाही. संपूर्ण कुटुंबाने एक दिवस रडून घेतलं, पण त्यानंतर सर्वांनी निर्धाराने उपचार सुरू ठेवले. मुलाच्या मानसिक आरोग्याचीही काळजी घेतली गेली. प्रत्येक तीन महिन्यांनी चाचण्या होत आणि कधीही कॅन्सर पुन्हा होऊ नये यासाठी सातत्याने उपचार सुरू ठेवावे लागले.
या काळात इमरानने स्वतः कॅन्सरविषयी आणि उपचारपद्धतीविषयी सखोल माहिती घेतली. डॉक्टरांनाही त्याचं ज्ञान आश्चर्यचकित करायचं. पालक म्हणून आपण काही कमी पडलो का, असा प्रश्न त्याला अनेकदा पडायचा. या संपूर्ण प्रवासावर त्याने एक पुस्तकही लिहिलं आहे, ज्यात त्याचा अनुभव आणि भावनिक संघर्ष मांडले आहेत.






