Election Commission | केंद्रीय निवडणूक आयोगानं 24 तासांच्या आत सलग दुसरा मोठा निर्णय घेतला आहे. याआधी मतदारयादीतून नाव वगळण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणल्यानंतर आता आयोगानं मतमोजणी प्रक्रियेबाबत महत्त्वाचा नियम जारी केला आहे. या निर्णयामुळे मतमोजणी अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि वेगवान होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Election Commission)
आयोगानं जारी केलेल्या नव्या नियमांनुसार, पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्यापूर्वी शेवटच्या दुसऱ्या फेरीची ईव्हीएम मतमोजणी सुरू करता येणार नाही. यापूर्वी ईव्हीएम मतमोजणी पोस्टल बॅलेटची मोजणी पूर्ण होण्याआधी सुरू केली जात होती. या बदलामुळे कोणत्याही प्रकारचा गोंधळ, वाद किंवा तक्रारी टाळता येणार आहेत.
पोस्टल बॅलेटची वाढती संख्या आणि नवे आदेश :
गेल्या काही निवडणुकांमध्ये पोस्टल बॅलेट (Postal Ballet) मतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी घरबसल्या मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे ही वाढ लक्षणीय आहे. या मतांची अचूक आणि वेळेत मोजणी व्हावी यासाठी आयोगानं अधिक टेबल्स आणि कर्मचारी उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. (Election Commission Breaking News)
यामुळे पोस्टल मतपत्रिकांची मोजणी वेळेत पूर्ण होणार असून, अंतिम निकाल जाहीर करण्यात होणारा विलंब टळणार आहे.
Election Commission | पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास वाढणार :
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे मतमोजणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि शिस्त राहील. त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण होईल. अनेकदा पोस्टल बॅलेटच्या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोप होत असत, मात्र आता या नव्या नियमामुळे वाद-विवाद कमी होण्याची अपेक्षा आहे.
एकूणच, पोस्टल बॅलेट आणि ईव्हीएम मतमोजणीची नवी व्यवस्था ही निवडणूक प्रक्रियेतील प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता अधिक दृढ करणारी ठरणार आहे.






