Eknath Shinde | आगामी महानगरपालिका (Municipal Corporation), जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि नगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी पक्षात जे कोणी येतील, त्या सर्वांना सामावून घ्या, असा स्पष्ट कानमंत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथे सोमवारी झालेल्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना, त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
मतदार याद्या बारकाईने तपासून आपले मतदार शोधा :
जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये झालेल्या या मेळाव्यात शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे निर्देश दिले. “आता फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बाकी आहेत. यात विजयी होण्यासाठी जे पक्षात येतील, त्यांना घ्या. मतदार याद्या बारकाईने तपासून आपले मतदार शोधा,” असे आवाहन त्यांनी केले.
उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज न होता, जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल, त्याच्यासाठी सर्वांनी एकत्र काम करावे, असेही ते म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य :
निवडणुकीपूर्वी पदाधिकाऱ्यांना एक विशेष ॲप दिले जाईल, ज्याद्वारे मतदारांची माहिती गोळा करून मतदार यादीत नाव आहे की नाही, हे तपासण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. या मेळाव्यानंतर, त्यांनी विभागीय आयुक्त आणि मनपा आयुक्तांकडून शहरातील पाणीपुरवठा योजना आणि इतर विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी पत्रकारांशी बोलताना शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरही भाष्य केले. “मराठा समाजाला प्रमाणपत्रे मिळतील आणि जीआरमुळे ओबीसींवर (OBC) कोणताही अन्याय होणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, एनडीएकडे (NDA) बहुमत असल्याने उपराष्ट्रपतीपदी सी. पी. राधाकृष्णन (C. P. Radhakrishnan) हेच निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






