Eknath Shinde | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महायुतीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे बालेकिल्ल्यात घडणाऱ्या घडामोडींमुळे त्यांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे. भाजपनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडूनही ठाण्यात स्वबळावर लढण्याचे संकेत दिले गेले आहेत. त्यामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. (Eknath Shinde)
भाजपाने नुकतीच राज्यातील विभागनिहाय बैठक घेऊन आगामी निवडणुकांची रणनीती आखली. जिथे युती शक्य आहे तिथे एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला असला, तरी जिथे ते शक्य नाही, तिथे मैत्रिपूर्ण लढती होतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मात्र, ठाण्यात परिस्थिती वेगळी दिसते आहे.
ठाण्यात राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा :
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटानं आता शिंदेंच्या अडचणी वाढवल्या आहेत. पक्षाचे सरचिटणीस आणि माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला यांनी ठाण्यात स्वबळावर लढण्याची मागणी केली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना याबाबत प्रस्ताव दिला असून, “महापौर आमचाच बसणार आणि तो आमच्या मर्जीतलाच असेल,” असा विश्वास व्यक्त केला आहे.
भाजपने “अबकी बार 70 पार” असा नारा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही “अबकी बार 25 पार” असा नारा देण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यात महायुतीच्या तीन घटक पक्षांमध्येच मतभेद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Eknath Shinde | शिंदे नाराज, ठाण्यात युतीत फूट पडणार का? :
ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, त्याच ठाण्यात आता भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिल्यानं शिंदेंचं टेन्शन वाढलं आहे. शिंदे गटातही असंतोषाचे सूर उमटू लागले आहेत.
अलीकडेच शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची मागणी केली. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, या विधानांवरून उपमुख्यमंत्री शिंदे चांगलेच नाराज झाले आहेत. आता युतीबाबत सर्व निर्णय शिंदे स्वतः घेतील, अशी माहिती समोर आली आहे.
महायुतीत अंतर्गत स्पर्धा तीव्र :
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिन्ही पक्षांमध्ये ठाणे महापालिकेवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची चुरस सुरू आहे.
प्रत्येक पक्ष आपला प्रभाव दाखवण्यासाठी आक्रमक रणनीती आखत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही आठवड्यांत महायुतीच्या आंतरिक राजकारणात मोठे बदल घडू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






