ST Bus Accident | जळगाव जिल्ह्यातील पारोळा-भडगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस प्रवाशांसह धुळे-सोयगाव मार्गावर जात असताना समोरून आलेल्या आयशर ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या अपघातात बसचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला असून भीषण दृश्य पाहून प्रवाशांनी मोठा आक्रोश केला. (ST Bus Accident)
एका प्रवाशाचा जागीच मृत्यू :
या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून तब्बल 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. धडकेनंतर अनेक प्रवासी बाजूच्या शेतात लोळत असल्याचेही हृदयद्रावक दृश्य दिसले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
ST Bus Accident | जखमींची उपचारासाठी धडपड :
जखमींना तात्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. यातील दोन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अपघातामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तातडीने रस्त्यावरून अपघातग्रस्त बस आणि ट्रक हटवून वाहतूक सुरळीत केली. (ST Bus Accident)
या घटनेने पुन्हा एकदा एसटी महामंडळाच्या बसेसच्या जीर्ण अवस्थेचा मुद्दा पुढे आला आहे. सरकार दरवर्षी नवीन बसेस खरेदी करण्याचे आश्वासन देते, मात्र रस्त्यावर धावणाऱ्या लालपरीच्या वारंवार अपघातांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.






