ED Raid Mumbai | सक्तवसुली संचालनालय (ED) ने मुंबईत मोठी धडक कारवाई करत 117.06 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी अमित अशोक थेपाडे (Ashok Thepade Arrested) यांना अटक केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), 2002 अंतर्गत सुरू असलेल्या तपासाचा भाग आहे. विशेष म्हणजे थेपाडे बराच काळ अधिकार्यांना चकवा देत होते. अखेर गुप्त माहितीच्या आधारे दक्षिण मुंबईतील एका पाचतारांकित हॉटेलमधून त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईदरम्यान ईडीने 50 हून अधिक बँक खाती गोठवली आहेत. तसेच 9.5 लाख रुपयांची रोकड, 2.33 कोटी रुपयांचे बुलियन, हिरे-जडित दागिने, दोन महागडी वाहने आणि वित्तीय पुरावे असणारी डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. या सर्व घडामोडीनंतर विशेष न्यायालयाने (PMLA) थेपाडे यांना 5 दिवसांच्या ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. (Ashok Thepade Arrested)
फसवणुकीची पद्धत आणि तपासातील निष्कर्ष :
या प्रकरणाचा तपास सीबीआय, एसीबी, पुणे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांवर आधारित आहे. आरोपी अमित थेपाडे यांच्या मालकीच्या गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन्स अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि. (GCCPL) आणि मित्सॉम एंटरप्रायजेस प्रा. लि. (MEPL) या कंपन्यांमार्फत कॅनरा बँकेतून मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यात आले होते. मात्र या कर्जासाठी आधीच विकलेल्या मालमत्तांना पुन्हा तारण ठेवणे किंवा एकाच मालमत्तेवर दोनदा तारण ठेवण्याचा मार्ग अवलंबण्यात आला. परिणामी बँकेला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला.
ईडीच्या मते, आरोपींनी फसवणुकीतून मिळालेल्या निधीचे मूळ स्वरूप लपवण्यासाठी गुंतागुंतीचे आर्थिक जाळे तयार केले होते. संशयास्पद व्यवहारांचे थर निर्माण करून पैशांची हेराफेरी करण्यात आली होती. दीर्घ काळ चाललेल्या गुप्त तपास, देखरेख आणि फॉरेन्सिक विश्लेषणानंतर अखेर या सर्व गैरव्यवहारांचा पर्दाफाश झाला.
ED Raid Mumbai | पुढील तपासातून काय उघड होणार? :
ईडीच्या या कारवाईनंतर बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 117 कोटींच्या प्रकरणाशी निगडित आणखी मालमत्ता, संशयास्पद खाती व परदेशी व्यवहारांची तपासणी सुरू झाली आहे. (Ashok Thepade Arrested)
थेपाडे यांच्याकडून अधिक चौकशी करण्यात येणार असून, या प्रकरणात इतर व्यक्तींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणात उमटण्याची शक्यता आहे.






