Dr. Sampada Munde | महिला डॉक्टर आत्महत्येने राज्य हादरलं. साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येने संपूर्ण राज्य हादरून गेलं आहे. आत्महत्येच्या आधी डॉक्टरने हातावर आत्महत्येचं कारण लिहिल्याने या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं आहे.
काकांकडून धक्कादायक खुलासा-
डॉक्टरने दोन व्यक्तींवर लैंगिक (Dr. Sampada Munde) अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप केले असून, यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचं नाव समोर आल्याने संपूर्ण पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली असून, आरोपी पोलिस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात पिडितेच्या काकांनी सांगितले की, “मधून-मधून ती सांगायची की मला पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स बदलण्यासाठी दबाव टाकतात आणि त्रास देतात, जर असचं चालत राहिलं तर मी जीव देईन”. असं पिडीत मुलगी बोलायची.
सीएम फडणवीसांचा आदेश:
या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलिसांकडून पीएसआय गोपाल बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे. फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या बदनेवर तसेच प्रशांत बनकर नावाच्या सामान्य नागरिकावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करून त्यांना पकडण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.
रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया:
या घटनेवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, “घडलेली घटना अत्यंत निंदनीय आहे. रक्षकानेच असे कृत्य करावे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपींवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही पाठपुरावा करू.” त्यांनी सांगितले की, आरोपी पोलीस अधिकारी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर दोघेही फरार आहेत आणि त्यांच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले आहेत.






