Dr. Sampada Munde Death Case | फलटण येथील महिला डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एका खासदाराचे नाव समोर आल्यानं राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, पोलिसांच्या तपासात या प्रकरणाशी संबंधित मोठा पुरावा समोर आला आहे. आरोपी पोलिस अधिकारी PSI गोपाळ बदने सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी सातारा आणि पंढरपूर पोलीस पथकं वेगवेगळ्या ठिकाणी तपास करत आहेत. (Dr. Sampada Munde Death Case)
फलटण आणि पंढरपूर पोलिसांचा संयुक्त तपास :
पोलिसांच्या माहितीनुसार, गोपाळ बदनेचे शेवटचे लोकेशन पंढरपूरमध्ये ट्रेस झाले आहे. त्यामुळे फलटण आणि पंढरपूर पोलीस मिळून सध्या विविध लॉज आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली दोन टीम्स या प्रकरणाचा शोध घेत आहेत. याशिवाय सातारा पोलिसांनीही पंढरपूरमध्ये स्वतंत्र पथक तैनात केलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याला 28 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून प्रशांतची कसून चौकशी सुरू असून त्याच्याकडून अनेक महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
Dr. Sampada Munde Death Case | संपदा मुंडे प्रकरणातील पार्श्वभूमी :
मुळच्या बीड जिल्ह्यातील कवडगाव येथील असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांची नेमणूक फलटण शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून झाली होती. मात्र, काही सहकारी अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यूपूर्वी संपदाने हातावर आरोपींची नावे लिहून धक्कादायक खुलासे केले होते.
संपदाच्या आई-वडिलांनीही पोलिसांकडे काही गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, संपदावर सतत दबाव आणला जात होता आणि तिला त्रास दिला जात होता. (Dr. Sampada Munde Death Case)
आमदार प्रकाश सोळंके यांची मुंडे कुटुंबीयांना भेट :
या घटनेनंतर आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील कवडगाव येथे संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. “या प्रकरणाचा पाठपुरावा वैयक्तिकरित्या करणार,” असे आमदार सोळंके यांनी सांगितले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चाचे अध्यक्ष बाबुराव पोटभरे हेही उपस्थित होते.






