Weather Alert | देशातील वातावरणात मोठा बदल होत असून भारतीय हवामान विभागाने दुहेरी अलर्ट जारी केला आहे. एकीकडे काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे उत्तर व मध्य भारतात तीव्र थंडीची लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरू आहे. मोंथा चक्रीवादळाच्या परिणामामुळे दक्षिण भारतातील अनेक भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे, उत्तर भारतातील अनेक भागांत तापमान झपाट्याने खाली येत असून थंडीचा कडाका वाढला आहे.
दक्षिण भारतात पावसाचा जोर, तर मध्य व उत्तर भारतात थंडीची लाट :
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 10 नोव्हेंबर रोजी केरळमध्ये (Keral) आणि 12 ते 13 नोव्हेंबरदरम्यान तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वाऱ्याच्या जोरासह काही भागांत अतिवृष्टीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याचबरोबर, बंगालच्या उपसागरात 3.1 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असून, याचा परिणाम देशाच्या मध्य भागातही जाणवतो आहे.
दरम्यान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण हरियाणामध्ये 10 व 11 नोव्हेंबरला थंडीची तीव्र लाट येण्याचा अंदाज आहे. या भागात रात्रीचे तापमान सामान्यपेक्षा 4 ते 7 अंश सेल्सिअसने कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
Weather Alert | महाराष्ट्रात गारठा वाढणार, मुंबईतही तापमानात घट :
महाराष्ट्रातही हिवाळ्याची चाहूल लागली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील तापमान 2 ते 4 अंशांनी खाली येईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. धुळे (Dhule), जळगाव (Jalgoan), आणि जेऊर या भागात किमान तापमान 10 अंशांखाली गेले आहे. महाबळेश्वरपेक्षा जळगाव थंड झाल्याचे चित्र आहे. (Maharashtra Weather Update)
हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील तापमानात मोठी घट झाली आहे. मुंबईत रविवारी 19 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले — हा या मोसमातील आतापर्यंतचा सर्वात नीचांक आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरात आठवडाभर सुखद गारव्याचा अनुभव मिळणार आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी :
हवामानातील हा बदल शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. गहू आणि हरभरा या रब्बी पिकांसाठी थंड आणि कोरडे वातावरण अत्यंत पोषक असते. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने आणि तापमान घटल्याने या पिकांच्या वाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.
बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यातही देशातील हवामान अस्थिर राहिले. मात्र आता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून हळूहळू थंडीचा हंगाम सुरू होत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे म्हणणे आहे.






