Akshaya Tritiya 2025 | आज 30 एप्रिल 2025 रोजी असलेल्या अक्षय्य तृतीयाला (Akshaya Tritiya 2025) अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. या विशेष दिवशी दान केल्याने आयुष्यातील त्रास दूर होतात आणि समाधान व समृद्धी प्राप्त होते. आजच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान केल्यास विशेष पुण्य मिळते, ते पाहुयात-
शुभ योगांनी परिपूर्ण अक्षय्य तृतीया 2025
यंदाची अक्षय्य तृतीया अनेक दशकांनंतर अत्यंत दुर्मिळ योगात साजरी होत आहे. या दिवशी रोहिणी नक्षत्र, शोभन योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रवि योग एकत्र आल्यामुळे याचे महत्त्व आणखी वाढले आहे. या दिवशी कोणतेही पुण्यकर्म केले तर ते ‘अक्षय’ म्हणजेच कधीही संपुष्टात न येणारे फळ देते, असे सांगितले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीया ही त्रेता युगाची सुरुवात मानली जाते आणि या दिवशी केलेले जप, दान व व्रत हे प्रचंड लाभ मिळवून देतात. जैन धर्मात हा दिवस अधिक पवित्र मानला जातो, कारण याच दिवशी भगवान ऋषभदेव यांचे व्रत इक्षुरस घेऊन पूर्ण झाले होते. त्यामुळे या दिवशी अन्न, पाणी आणि औषध यांचे दान करणे अत्यंत फलदायी ठरते.
‘या’ वस्तु करा दान-
अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते. परंतु, सोने-चांदी खरेदी शक्य नसेल, तर मातीची भांडी, धान्य, तूप, गूळ इत्यादी वस्तू खरेदी करून दान केल्यास तेवढेच पुण्य लाभते. सकाळी 5:41 ते दुपारी 2:12 या काळात दान किंवा खरेदी केल्यास विशेष शुभत्व प्राप्त होते.
या दिवशी दान करण्यासाठी खालील वस्तूंना विशेष महत्त्व दिले जाते:
अन्नदान: तांदूळ, डाळ, गहू, पीठ इत्यादी धान्याचे दान करणे अत्यंत शुभ आहे.
वस्त्रदान: पांढरे किंवा नवीन कपडे गरजू लोकांना देणे शुभ मानले जाते.
पाण्याचे दान: तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यात भरलेले पाणी, कलश दान करणे उत्तम.
सोन्या-चांदीच्या वस्तू: दागिने, नाणी किंवा चांदीची पात्रे दान करणे शुभ फळ देणारे ठरते.
विशिष्ट पदार्थ: दूध, दही, साखर, खीर, शंख इत्यादी पवित्र वस्तूंचे दान अत्यंत पुण्यदायी. (Akshaya Tritiya 2025)
प्राणीसेवा: पाळीव प्राण्यांसाठी अन्न-पाणी देणे किंवा त्यांच्यासाठी शेडमध्ये दान करणे.
गरजूंची मदत: गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र, औषधे यांची मदत करणे अक्षय पुण्य प्रदान करते.
Title: Donate These Things on Akshaya Tritiya 2025 for Eternal Blessings






