Mumbai | मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदाची ठरली आहे. आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी दिपावली २०२५ निमित्त कर्मचाऱ्यांना तब्बल ३१ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचा बोनस जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कर्मचारी आणि अधिकारी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार (ajit pawar) यांनीही मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai mahangarpalika) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
बोनसमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये जल्लोष :
मुंबई महानगरपालिकेच्या (Mumbai mahangarpalika) कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ३१ हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. यात महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी, अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालिका प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याते आणि शिक्षण सेवकांचा समावेश आहे. या सर्वांना ३१ हजार रुपयांचा लाभ मिळणार असून, अनेक कुटुंबांसाठी ही दिवाळी गोड होणार आहे.
सामाजिक आरोग्य स्वयंसेविका (CHV) यांनाही प्रशासनाकडून भाऊबीज भेट म्हणून १४ हजार रुपयांची भेट दिली जाणार आहे. तसेच बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना ५ हजार रुपयांची भेट जाहीर झाली आहे. आयुक्त भूषण गगराणी यांच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. दीर्घकाळापासून बोनस जाहीर होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही घोषणा एक मोठी दिलासा देणारी ठरली आहे.
KDMC आणि वसई–विरार पालिकेकडूनही बोनसची गोड बातमी :
मुंबईप्रमाणेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील (KDMC) कर्मचाऱ्यांनाही यंदा दिवाळी बोनसचा आनंद मिळणार आहे. आयुक्तांनी २०,००० रुपयांचा बोनस जाहीर केला असून, कायम, परिवहन आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी आयुक्तांशी चर्चा करून हा निर्णय निश्चित केल्याची माहिती दिली आहे. याशिवाय, KDMC ने बंद केलेला आशा वर्करांचा बोनस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, ४५० आरोग्यसेविकांना प्रत्येकी ५,००० रुपयांचा बोनस दिला जाणार आहे.
वसई–विरार (Vasai- Virar) शहर महानगरपालिकेनेही कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी ३,६४० कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २२ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. या बोनसचा लाभ कायमस्वरूपी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी बोनस रकमेत २ हजार रुपयांची वाढ करण्यात आली असून, पालिकेवर एकूण ८ कोटी ८ लाख रुपयांचा आर्थिक भार येणार आहे. मुंबई, KDMC आणि वसई–विरार महानगरपालिकांकडून बोनस घोषणांमुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांच्या घरात आनंदाची लाट उसळली आहे. काही वर्षांच्या तुलनेत यंदा बोनस रकमेत झालेली वाढ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे कौतुक म्हणून दिला गेलेला हा आर्थिक दिलासा त्यांच्या कुटुंबीयांसाठीही आनंदाचा स्रोत ठरला आहे.
या घोषणांमुळे राज्यभरातील पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड आणि उजळून निघाली आहे. मुंबई, KDMC आणि वसई–विरारमधील कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहता यंदाची दिवाळी ‘बोनसची दिवाळी’ म्हणून ओळखली जाईल, यात शंका नाही.






