Mumbai | दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांना मोठा धक्का दिला आहे. 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत एसटीच्या (ST) सर्व बसेससाठी 10 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शिवनेरी आणि शिवाई या वातानुकूलित (AC) बसना या भाडेवाढीतून सूट देण्यात आली आहे.
दिवाळीच्या प्रवासावर थेट परिणाम
दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो चाकरमानी दिवाळी साजरी करण्यासाठी आपल्या गावी जाणार आहेत. अशा वेळी या भाडेवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. उदा. – जिथे आधी 100 रुपयांचे तिकीट होते, तिथे आता 110 रुपये आकारले जातील.
एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर गेल्या काही वर्षांपासून प्रश्नचिन्ह आहे. कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यांमुळेही मंडळ अडचणीत आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे महसूल वाढवण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे.
प्रवाशांची झुंबड आणि तिकीटांचा तुटवडा
दिवाळीत बसस्थानकांवर प्रचंड गर्दी होते. गावी जाण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडते. त्यामुळे तिकीट मिळवणेही कठीण होते. अशा वेळी अतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. याआधी जानेवारी 2025 मध्ये एसटी महामंडळाने 14.95 टक्क्यांची मोठी भाडेवाढ लागू केली होती. त्या वेळीही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती.
यंदाची दिवाळी फटाक्यांपेक्षा तिकीट महागाईनेच पेटणार असून एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांच्या खिशाला यातून चांगलाच फटका बसणार आहे.
News Title – Diwali travel gets costlier; MSRTC’s ticket fares to increase by this much percent






