Laxmi Pujan 2025 | दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. देवी लक्ष्मीच्या स्वागताचा आणि पूजनाचा हा दिवस दरवर्षी अश्विन अमावस्येला साजरा केला जातो. यंदा मात्र अमावस्या तिथी दोन दिवसांवर पसरल्यामुळे लक्ष्मीपूजन नेमके कोणत्या दिवशी करावे याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
अमावस्या दोन दिवस, पूजेचा योग्य मुहूर्त कधी? :
पंचांगानुसार, यावर्षी अश्विन अमावस्या तिथीची सुरुवात सोमवार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी होत आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी, म्हणजेच मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत राहील. लक्ष्मीपूजन सामान्यतः प्रदोष काळात, म्हणजेच सूर्यास्तानंतर केले जाते आणि या काळात अमावस्या तिथी असणे शुभ मानले जाते.
शास्त्रानुसार, सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तिथीला दिवसाची मुख्य तिथी मानले जाते (उदया तिथी). २० ऑक्टोबरला अमावस्या दुपारी सुरू होत असल्याने सूर्योदय अमावस्येत नाही. याउलट, २१ ऑक्टोबर रोजी सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी आहे, जी दर्श अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. त्यामुळे, २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करणे अधिक शास्त्रसंमत आणि उचित मानले जात आहे. यानुसार, मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ४० मिनिटांपर्यंतचा २ तास २० मिनिटांचा कालावधी लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत शुभ मुहूर्त आहे.
Laxmi Pujan 2025 | घरी लक्ष्मीपूजन कसे करावे? :
लक्ष्मीपूजनाची मांडणी घरातील उत्तर किंवा ईशान्य दिशेला करावी. एका चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरून घ्यावे. चौरंगाच्या उजव्या बाजूला तांदळाची रास करून त्यावर पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा. कलशामध्ये एक नाणे, विड्याची पाने आणि काही तांदळाचे दाणे टाकून त्यावर नारळ ठेवावा.
चौरंगाच्या मध्यभागी देवी लक्ष्मी, गणपती आणि धनाची देवता कुबेर यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापन करावी. मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास प्रतिकात्मक रूपात सुपारी ठेवू शकता. त्यानंतर चौरंगावर तुमच्याकडील पैसे, सोने-चांदीचे दागिने किंवा नाणी मांडावीत. फुले, हळद-कुंकू वाहून चौरंगाची आणि देवतांची पूजा करावी. या दिवशी नवीन केरसुणीची (झाडूची) पूजा करण्याचीही परंपरा आहे. पूजेनंतर देवीला फराळाच्या पदार्थांचा आणि गोडाचा नैवेद्य अर्पण करावा.






