CSK l चेन्नई सुपर किंग्जच्या (CSK) चाहत्यांसाठी एक मोठं सरप्राईज असू शकतं. कारण संघाचा सध्याचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे आजच्या सामन्यासाठी अनुपलब्ध राहू शकतो आणि अशा स्थितीत महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा संघाची कमान सांभाळू शकतो, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ऋतुराजच्या दुखापतीमुळे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह? :
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज गायकवाडला झालेल्या दुखापतीनंतर त्याने सराव सत्रही चुकवले. चेन्नईचे फलंदाजी प्रशिक्षक माइक हसी यांनीही यावर शिक्कामोर्तब करत सांगितले की, गायकवाड अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त नाही. शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत हसी यांनी सांगितले, “तो नेटमध्ये फलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे, पण आम्ही अंतिम निर्णय सरावानंतर घेऊ.”
जर ऋतुराज आजच्या दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात खेळण्यास असमर्थ ठरला, तर CSK संघासाठी नव्या कर्णधाराची गरज निर्माण होणार आहे. संघात सध्या दुसरा ठोस पर्याय उपलब्ध नसल्याने, साऱ्या नजरा पुन्हा एमएस धोनीकडे वळल्या आहेत. हसीने याबाबत उघडपणे धोनीचे नाव न घेतले तरी संकेत स्पष्ट दिले आहेत.
CSK चाहत्यांसाठी मोठा क्षण? थाला पुन्हा मैदानात नेतृत्व करताना? :
धोनी सध्या केवळ खेळाडू म्हणून संघात असला तरी त्याचं मार्गदर्शन आणि अनुभव संघासाठी अमूल्य आहे. जर तो पुन्हा कर्णधार म्हणून पुढे आला, तर चाहत्यांसाठी ते एका स्वप्नपूर्तीसारखं ठरेल. चेपॉक स्टेडियममध्ये ‘थाला’ला पुन्हा एकदा नेतृत्व करताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणं, हे उत्साही क्षण ठरू शकतात.
यंदाच्या हंगामात चेन्नईने आतापर्यंत केवळ एकच सामना जिंकला आहे, त्यामुळे प्रत्येक सामन्याचे महत्त्व वाढले आहे. अशा वेळी धोनीचं मैदानात कर्णधार म्हणून पुनरागमन संघासाठी मानसिक बळ ठरू शकते.






