Maharashtra Politics | राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच पक्षांतराच्या घडामोडींनी वेग घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीला (MVA) लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे.
विजयकुमार सोनवणे यांचा भाजपमध्ये प्रवेश :
धाराशिव जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे (Vijaykumar Sonavane) आणि अमर सोनवणे (Amar Sonvane) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केला आहे. मुंबईत (Mumbai) भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत आणि माजी मंत्री बसवराज पाटील (Basavraj Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश पार पडला. ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Maharashtra Politics | पक्षांतराचे वारे कायम, महायुतीतही इनकमिंग :
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी सत्ताधारी महायुतीची (Mahayuti) वाट धरली होती. याचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसला बसला होता. आता स्थानिक निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा पक्षांतराचे सत्र सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, केवळ महाविकास आघाडीतूनच नव्हे, तर महायुतीमधील मित्रपक्षांमधूनही (शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट) भाजपमध्ये इनकमिंग सुरू असल्याचे चित्र आहे. यावरून खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
सोमवारी गडचिरोलीत काँग्रेसने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिला होता, तर आज भाजपने काँग्रेसच्या नेत्याला आपल्या गोटात खेचून आणले आहे. स्थानिक निवडणुका आघाडी म्हणून लढणार की स्वबळावर, याबाबतची अनिश्चितता कायम असतानाच हे पक्षांतर सुरू असल्याने राजकीय समीकरणे आणखी गुंतागुंतीची झाली आहेत.






