Dhananjay Munde | मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. आजचा दिवस मनोज जरांगे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या शाब्दिक चकमकीमुळे राजकीयदृष्ट्या गाजला. मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर त्यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला, तर मुंडेंनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत थेट पलटवार करत त्यांना कर्माची आठवण करून दिली.
जरांगे (Manoj jarange patil) यांनी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केला की, धनंजय मुंडे यांनी त्यांना संपवण्यासाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी दिली आहे. हा आरोप समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर दुपारी मुंडेंनी जोरदार प्रतिउत्तर देत जरांगे यांच्या भाषेवर, भूमिकेवर आणि सरकारच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली.
“आम्ही राग गिळला, पण मर्यादा ओलांडू नका” :
पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले की, “जरांगे जी मुख्यमंत्र्यांवर, उपमुख्यमंत्र्यांवर, भुजबळांवर आणि आमच्यावरही जाहीरपणे अपमानास्पद भाषा वापरतात. आम्ही राग गिळलाय कारण आम्हाला मराठा आरक्षण मिळावं असं वाटतं. पण याचा अर्थ आम्ही गप्प राहू असं नाही.”
मुंडे पुढे म्हणाले, “घरातील आयबहिणींविषयी जरांगे जे बोलतात, ती परंपरा मराठा समाजाची नाही. आम्ही शांत राहिलो कारण प्रश्न समाजाचा आहे, पण हे वर्तन योग्य नाही. आपल्या आंदोलनाचं स्वरूप मर्यादेत ठेवा, अन्यथा परिणाम गंभीर होतील,” असा इशारा त्यांनी दिला.
Dhananjay Munde | “पोलीस यंत्रणा घाबरली आहे, सरकार बघ्याची भूमिका घेतंय” :
मुंडेंनी यावेळी पोलीस आणि सरकारवरही ताशेरे ओढले. ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल, पण पोलीस यंत्रणा जरांगे यांना घाबरली आहे. त्यामुळे जे काही चाललं आहे त्याकडे सगळे डोळेझाक करत आहेत. प्रत्येक मुद्द्यावर माझं नाव घेतलं जातं, हे किती हास्यास्पद आहे?”
ते पुढे म्हणाले, “त्या दिवशीच्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसीचा मुद्दा काढला म्हणून राग आला, की मी चष्मा पाठवला नाही म्हणून राग आला? माझ्यापासून संपूर्ण पृथ्वीला धोका आहे, असं म्हणत आहेत! मी काय कोविड व्हायरल झालो काय?” असा टोलाही त्यांनी जरांगेना लगावला.
“जरांगे जी… या गोष्टी महागात पडतील, कर्मा रिपीट!” :
पत्रकार परिषदेत शेवटी मुंडेंनी जरांगेंना थेट इशारा दिला. ते म्हणाले, “माझं फोनवर बोलणं झालं असं म्हणतात. मी सतत लोकांच्या संपर्कात असतो, गरीबांची अडचण सोडवण्यासाठी फोन ठेवतो. पण याचा अर्थ काही वेगळा लावू नका. या सर्व गोष्टी जरांगे जी महागात पडणार आहेत. कर्मा रिपीट! तुम्ही जेवढं खोटं कराल, तेवढं ते मागे फिरेल,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. मराठा आरक्षणावरून सुरू झालेलं आंदोलन आता वैयक्तिक आरोपांच्या स्तरावर पोहोचलं असून, पुढील काही दिवसांत या वादाचा सूर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.






