धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या; अजित पवारांचे महत्त्वाचे आदेश

On: February 12, 2025 1:35 PM
Dhananjay Munde Under Fire Corruption Probe & Murder Case Shake Politics
---Advertisement---

Dhananjay Munde | मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) हा अटकेत असून तो मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा अत्यंत निकटवर्तीय आहे. यामुळे धनंजय मुंडे देखील सतत टार्गेट होत आहेत.  या प्रकरणामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असून, विरोधकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याची चर्चा आहे.

हत्या प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तणाव

संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणामुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर, धनंजय मुंडे पालकमंत्री असताना बीड जिल्हा नियोजन समितीतील निधी वितरणात झालेल्या अनियमिततेबद्दलही आरोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील दोन वर्षांमध्ये खर्च झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी सुरू केली आहे.

भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी धनंजय मुंडेंवर जोरदार निशाणा साधत, परळी आणि आंबाजोगाई येथे 2021-22 या कालावधीत कोट्यवधी रुपयांची कामे न करताच बिले उचलल्याचा आरोप केला आहे. तब्बल 37 कोटी 70 लाख रुपयांची बिले बोगस स्वरूपात काढण्यात आली, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील नऊ कामांसाठी 13 कोटींची अनियमित बिले मंजूर करण्यात आली, मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम झाले नाही, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

अजित पवारांची मोठी कारवाई, बीडच्या अधिकाऱ्यांसोबत मुंबईत तातडीची बैठक

विरोधकांच्या या आरोपांची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी 877 कोटी निधीच्या चौकशीला वेग दिला आहे. विशेषतः शाळा आणि अंगणवाड्यांना साहित्य पुरविण्यात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले आहे.

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, हत्या प्रकरण आणि भ्रष्टाचाराच्या चौकशांमुळे त्यांच्यावर मोठा राजकीय तणाव निर्माण झाला आहे. आता पुढील राजकीय घडामोडी काय वळण घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Title : Dhananjay Munde Under Fire Corruption Probe & Murder Case Shake Politics

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now