Dhananjay Munde | राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी विवाहच झालेला नाही, असा ठाम दावा करत वांद्रे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. आज या प्रकरणाची सुनावणी माझगाव सत्र न्यायालयात झाली आणि यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे.
…म्हणून धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली
यापूर्वी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी असून त्यांना दरमहा दोन लाख रुपयांची पोटगी द्यावी, असा आदेश दिला होता. मात्र, हा निर्णय योग्य नसल्याचा दावा करत धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा खळबळजनक आरोप
आजच्या सुनावणीत धनंजय मुंडे यांचे वकील सायली सावंत यांनी करुणा शर्मा यांच्याशी विवाह झाल्याचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगितले. त्यांनी कोर्टात स्वीकृतीपत्र सादर केले असले तरी, ते लग्नाचे पुरावे मान्य नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. शिवाय, करुणा शर्मा यांनी सादर केलेली काही कागदपत्रे बनावट असल्याचा आरोपही त्यांनी केला. याप्रकरणी कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली असल्याचेही सावंत यांनी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, सायली सावंत यांनी हेही सांगितले की, करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्यासोबत काही काळ राहत होत्या, परंतु त्या त्यांच्या कायदेशीर पत्नी नाहीत. तसेच, खालच्या न्यायालयात ज्या कागदपत्रांवर आधार घेऊन निर्णय देण्यात आला, त्यात चुकीच्या माहितीचा वापर झाल्याचा दावाही त्यांनी केला.
दुसरीकडे, करुणा शर्मा यांचे वकील म्हणाले की, त्यांनी सादर केलेली कागदपत्रे महत्त्वाची असून ती नाकारता येणार नाहीत. त्यांनी युक्तिवाद करताना स्पष्ट केले की, वसियतनामा आणि इतर कागदपत्रांतून त्यांच्या विवाहाचे संकेत मिळतात आणि न्यायालयाने त्याकडे दुर्लक्ष करू नये.
कोर्टाने आता दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतला असून, लवकरच या प्रकरणी निकाल देण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी करुणा शर्मा यांच्यासाठी ही कायदेशीर लढाई अधिक गुंतागुंतीची आणि कठीण होण्याची चिन्हे दिसत आहेत.






