Dhananjay munde | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्यातील वादाला मोठं वळण लागलं आहे. करुणा शर्मा यांनी न्यायालयात पत्नी असल्याचा दावा केला असतानाच, धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी ते नाकारत करुणा शर्मा फक्त ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये होत्या, असा मोठा दावा केला आहे. या युक्तीवादामुळे कोर्टातील वातावरण चांगलंच तापलं.
कोर्टात जोरदार युक्तिवाद
मुंबई सत्र न्यायालयाने यापूर्वी करुणा शर्मा यांच्यासाठी महिन्याला 2 लाख रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला होता. मात्र करुणा शर्मा यांनी 15 लाख रुपयांची पोटगी मागणी करत न्यायालयात पुरावे सादर करण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान त्यांनी विवाहासंबंधी विविध दस्तऐवज सादर केले.
करुणा शर्मा यांनी सांगितले की, “१९९६ पासून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत आहे. आमचं लग्न मंदिरात झालं, जरी लग्नाचा प्रमाणपत्र नसेल तरी इतर कागदपत्रे, मुलांचे जन्म दाखले, पासपोर्ट, मृत्यूपत्र यामध्ये मला पत्नी म्हटलं आहे.” त्यांनी हेही सांगितले की, “त्यांनी २०१६ मध्ये तयार केलेल्या मृत्यूपत्रातही मला पहिली पत्नी म्हटले आहे.”
धनंजय मुंडेंकडून फेटाळण्याचा प्रयत्न, करुणा शर्मांचा आत्मविश्वास
धनंजय मुंडे यांनी या सर्व दाव्याला विरोध करत करुणा शर्मा पत्नी नव्हत्या, ते दोघं केवळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, असं कोर्टात सांगितलं. त्यांचे वकील युक्तीवाद करताना म्हणाले की, “करुणा शर्मा यांच्याकडे वैध विवाहाचे प्रमाणपत्र नाही. त्यामुळे त्यांना पत्नी म्हणता येणार नाही.”
दरम्यान, करुणा शर्मा यांनी कोर्टातच संताप व्यक्त करत म्हणाल्या की, “माझे वकील योग्यरित्या बाजू मांडत नाहीत, त्यामुळे मी स्वतः मांडते.” त्यांनी स्पष्ट केलं की, “धनंजय मुंडे यांनी माझं जीवन उद्ध्वस्त केलं. माझ्या आणि मुलांच्या जीवाला कायम धोका आहे. २० कोटींचा सौदा करून माझ्याशी लग्न करणाऱ्याला पैसे देणार होते.”
या प्रकरणात आता पुढील सुनावणीत काय निर्णय येतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. करुणा शर्मा यांनी दाखल केलेले पुरावे आणि धनंजय मुंडे यांची बाजू – या दोहोंवरच न्यायालयाचा अंतिम निर्णय अवलंबून असेल.
Title: Munde Denies Marriage, Claims Live-in With Karuna






