मराठवाड्यात महापूर का आला? देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं सर्वात मोठं कारण!

On: September 25, 2025 12:12 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उध्वस्त झाला आहे. धाराशिव, जालना, लातूर, बीड आणि परभणी अशा जवळपास सर्व जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. घरं कोसळली, शेतं जलमय झाली आणि कष्टाने पेरलेली पिकं पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या अशा-अपेक्षांवर पाणी फिरलं आहे. गावोगावी नुकसानीचे पंचनामे चालू झाले असून प्रशासन यामध्ये पूर्ण ताकतीने काम करत आहे.

या महाप्रलयाची तीव्रता इतकी आहे की मराठवाड्याच्या (Marathwada) प्रत्येक कुटुंबाला याचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिथे नजर जाईल तिथे फक्त पाणी आणि नाराज झालेले नागरिक अशी वाईट परिस्थिती आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले आहे.

फडणवीसांचं विधान; हवामान बदल ठरलं मुख्य कारण :

या पूरपरिस्थितीचं मुख्य कारण हवामान बदल असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही वर्षांत मराठवाड्याला दुष्काळ, गारपीट आणि अतिवृष्टी अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याचं त्यांनी सांगितलं. हवामान बदलाचा परिणाम या ठिकाणी अधिक तीव्रतेने जाणवत असून याचा शेतीवर सर्वाधिक फटका बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती विस्कळीत झाली आहे.

मराठवाड्यात २१ सप्टेंबरपर्यंत तब्बल २३ लाख ४१४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यावरून ही परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. हवामान बदलाच्या परिणामांना आळा घालण्यासाठी जागतिक बँकेने दिलेले सहा कोटी रुपये शेतीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती ही फडणवीस यांनी दिली. हवामान बदलाचा परिणाम सहन करू शकेल अशी शेती करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis | मुसळधार पाऊस येण्याची शक्यता :

दरम्यान, हवामान खात्याने पुन्हा मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच क्षेत्र निर्माण झाला आहे, ज्यामुळे विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. विशेषतः २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील काही भागात पावसाची तीव्रता जास्त असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्य सरकारकडून तातडीने मदत जाहीर होईल अशी अपेक्षा शेतकरी आणि नागरिक यांच्याकडून केली जात आहे. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा मिळून मदत कार्य करत आहेत. तरीही वाढत्या पावसामुळे भीतीचे सावट कायम आहे.

News title : CM Devendra Fadnavis On Heavy Rain In Marathwada

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now