स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत

On: November 5, 2025 3:03 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. मतदार याद्यांमधील त्रुटींचा मुद्दा घेऊन विरोधकांनी निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिलेले वक्तव्य आता चर्चेचा विषय ठरत आहे.

मतदार याद्या सदोष असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दुबार आणि तिबार नावे असल्याचे सांगत निवडणुका न घेण्याचे आवाहन केले होते. पण निवडणूक आयोगाने कालच कार्यक्रम जाहीर करत निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना थेट फटकारले आहेत.

महायुती एकत्र लढणार की स्वबळावर? :

या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी महायुतीतील समन्वयावरही भूमिका स्पष्ट केली. “निवडणुकांची घोषणा झाली आहे. आम्ही निवडणुकांना सामोरं जाऊ. तिन्ही पक्ष आपापल्या स्तरावर युतीसंदर्भात निर्णय घेतील. पण कुठल्याही परिस्थितीत आम्ही तिघं एकच आहोत. कुठं युती झाली नाही तरी आमची पोस्टपन युती होईल,” असे फडणवीस म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रातील जनता या निवडणुकांमध्ये महायुतीलाच कौल देईल, असा त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महायुतीतील एकजूट आणि आत्मविश्वास अधोरेखित झाला आहे.

Devendra Fadnavis | उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा निशाणा :

उद्धव ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी ‘दगाबाजरे’ अशी सरकारविरोधी मोहीम सुरू केली आहे. त्यांनी कर्जमाफीपासून ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारवर टीका केली.

त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “पहिल्यांदाच उद्धव ठाकरे बाहेर पडल्याचा आनंद आहे. ते फक्त टोमणे मारू शकतात, पण विकासावर त्यांचे एक भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा,” असा टोलाही त्यांनी लगावला. या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापले आहे.

निवडणुका पुढे ढकलतील का? :

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका पुढे ढकलणे अशक्य आहे. त्यांनी सांगितले की, निवडणुका नियोजित वेळेतच होतील आणि महाराष्ट्राची जनता महायुतीलाच कौल देईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय चर्चांना अधिक वेग आला असून, पुढील काही दिवसांत निवडणुकांचे रणांगण अधिक तापणार हे निश्चित आहे.

News Title: Devendra Fadnavis Hints at Local Body Elections Amid Opposition Demands to Postpone Polls

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now