Devendra Fadnavis | भाजपाच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यावर पुन्हा एकदा मोठी जबाबदारी सोपवली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत फडणवीसांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता फडणवीस बिहारच्या रणांगणात प्रचार करताना दिसणार आहेत.
देवेंद्र फडणवीस हे केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरही पक्षाचे प्रभावी नेते मानले जातात. पक्षात कोणताही मोठा निर्णय घेताना त्यांचे मत महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे बिहार निवडणुकीत फडणवीस यांची एन्ट्री झाल्यानं महाराष्ट्रासोबतच दिल्लीतील राजकीय वर्तुळातही चर्चा रंगल्या आहेत.
बिहार निवडणुकीत फडणवीसांची एन्ट्री :
बिहारमध्ये (Bihar election) सध्या राजकीय वातावरण तापले आहे. सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, प्रचारयुद्धालाही सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने आपली स्टार प्रचारकांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव थेट समाविष्ट आहे.
म्हणजेच, लवकरच फडणवीस बिहारमध्ये भाजपाच्या आणि नितीश कुमार यांच्या एनडीए उमेदवारांच्या समर्थनार्थ प्रचारसभा घेताना दिसतील. या माध्यमातून बिहारमध्ये भाजपाचा प्रभाव वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
Devendra Fadnavis | मोदींसह 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर :
भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 40 नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, धर्मेंद्र प्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, तसेच आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांचा समावेश आहे.
तसंच, महाराष्ट्रातून विनोद तावडे यांचंही नाव या यादीत आहे. तावडे हे बिहार निवडणुकीसाठी भाजपाचे प्रभारी आहेत. त्यामुळे फडणवीस आणि तावडे या दोघांची जोडी बिहारमध्ये भाजपाच्या प्रचारात आघाडीवर राहणार आहे.
फडणवीसांच्या नव्या भूमिकेकडे लक्ष :
भाजपाने दिल्लीतून फडणवीसांवर सोपवलेली ही जबाबदारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नाही, तर राष्ट्रीय स्तरावरील त्यांचा वाढता प्रभाव याचं प्रतीक मानलं जात आहे. महाराष्ट्रात सत्तेत असतानाही त्यांनी राष्ट्रीय राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, बिहार निवडणुकीनंतर फडणवीसांना पक्षात आणखी महत्त्वाची भूमिका मिळू शकते. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत त्यांचा बिहार दौरा आणि प्रचार मोहिमेवर सर्वांचं लक्ष केंद्रित होणार आहे.






