Dhananjay Munde | बीड जिल्ह्यातील बीड–अहिल्यानगर रेल्वेसेवेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केलेले भाषण सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरले आहे. विकासकामांसह राजकीय संदर्भांनी रंगलेल्या या भाषणात फडणवीस यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा “आमचे मित्र” असा उल्लेख केला. यानंतर उपस्थित प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि या एका वाक्यावरून जिल्हाभरात चर्चा सुरू झाली आहे.
रेल्वेसेवेचं उद्घाटन – बीडकरांची जुनी मागणी पूर्ण :
गेल्या अनेक दशकांपासून बीड जिल्ह्यात रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. अखेर १७ सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुरू झाली. अवघ्या ४५ रुपयांत हा प्रवास करता येणार असून, लोकांच्या वाहतूक अडचणी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहेत.
फडणवीस यांनी आपल्या भाषणात या प्रकल्पासाठी प्रयत्न करणाऱ्या राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचे अभिनंदन केले.
Dhananjay Munde | धनंजय मुंडेंभोवतीचे वाद :
फडणवीसांनी सुरुवातीला पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे कौतुक करत त्यांना “गोपीनाथ मुंडेंचा वारसा समर्थपणे पुढे नेणारी नेत्री” म्हटले. त्यानंतर खासदार रजनी पाटील आणि बजंरग सोनवणे यांचा उल्लेख केला. मात्र, धनंजय मुंडे यांचे नाव घेताना त्यांनी खास करून “आमचे मित्र धनंजय मुंडे” असं म्हटल्यावर प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा गडगडाट झाला. यावरून हा उल्लेख कौतुकाचा होता की, सूचक इशारा, याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
अलीकडेच सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणात धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) निकटवर्तीयाचे नाव समोर आल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भाजप आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण जोरदार लावून धरल्याने मुंडे अडचणीत आले. अशा पार्श्वभूमीवर फडणवीसांनी केलेला “मित्र” हा उल्लेख अनेकांना राजकीय पेचात टाकणारा ठरत आहे.






