UPSC Aspirant Killed | राजधानी दिल्लीतील (Delhi) गांधी विहार (Gandhi Vihar) परिसरात ६ ऑक्टोबर रोजी लागलेल्या आगीत UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या राम केश मीना (Ram Kesh Meena) या ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सुरुवातीला अपघात वाटत होती. मात्र, दिल्ली पोलिसांच्या तपासात हा अपघात नसून, एक सुनियोजित हत्या असल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, ही हत्या राम केशच्या लिव्ह-इन पार्टनरनेच तिच्या एक्स-बॉयफ्रेंड आणि मित्राच्या मदतीने घडवून आणली होती.
हत्येमागील कारण आणि ‘फिल्मी’ कट :
तिमारपूर (Timarpur) पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. राम केश मीना याचा जळालेला मृतदेह त्याच्या चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून सापडला होता. सुरुवातीला हा गॅस सिलेंडर स्फोटामुळे झालेला अपघात वाटत होता. मात्र, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, घटनेच्या रात्री दोन नकाबधारी व्यक्ती त्या बिल्डिंगमध्ये शिरताना दिसल्या, ज्यामुळे पोलिसांना संशय आला. यातील एक व्यक्ती मुलगी असल्याचे निष्पन्न झाले, तिचे नाव अमृता चौहान (Amrita Chauhan) होते. घटनेच्या रात्री तिचे मोबाईल लोकेशनही गांधी विहार (Gandhi Vihar) परिसरातच असल्याचे आढळले.
पोलिसांनी अमृताला उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुरादाबाद (Moradabad) येथून १८ ऑक्टोबर रोजी अटक केली. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली दिली. अमृताने सांगितले की, ती राम केश सोबत लिव्ह-इनमध्ये राहत होती. राम केशने तिचे काही अश्लील व्हिडिओ आणि खाजगी फोटो काढून एका हार्ड डिस्कमध्ये सेव्ह केले होते. तिने ते डिलीट करण्यास सांगितले असता त्याने नकार दिला. यानंतर अमृताने तिचा एक्स-बॉयफ्रेंड सुमित कश्यपला (Sumit Kashyap) (वय २७) याबाबत सांगितले. सुमित संतापला आणि त्याने राम केशची हत्या करून ती हार्ड डिस्क मिळवण्याचा कट रचला. यात त्याने त्याचा मित्र संदीप कुमारलाही (Sandeep Kumar) (वय २९) सामील करून घेतले. अमृता बीएससी फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी असून, क्राईम वेब सिरीज पाहण्याची तिला आवड होती, त्यामुळे तिला हत्या अपघातासारखी दाखवण्याची कल्पना सुचली.
UPSC Aspirant Killed | असा घडवला हत्येचा बनाव :
पोलिसांच्या माहितीनुसार, अमृताचा एक्स-बॉयफ्रेंड सुमित गॅस सिलेंडर वितरणाचे काम करत असल्याने त्याला सिलेंडरच्या तांत्रिक बाबींची माहिती होती. त्यांनी गॅस गळतीमुळे स्फोट घडवून आणण्याची योजना आखली. ५-६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री अमृता, सुमित आणि संदीप हे राम केशच्या फ्लॅटवर पोहोचले. त्यांनी आधी गळा दाबून आणि मारहाण करून राम केशची हत्या केली. त्यानंतर मृतदेहावर तेल, तूप आणि दारू ओतली.
त्यांनी सिलेंडरची नळी काढून गॅस चालू केला आणि लायटरने आग लावली. सिलेंडर किती वेळात स्फोट होईल याचा अंदाज सुमितला होता. ते तिघे फ्लॅटमधून बाहेर पडले. अमृताने खिडकीच्या जाळीत छिद्र करून आत हात घालून दरवाजा आतून बंद केला. काही वेळाने सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यात राम केशचा मृतदेह जळाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सुमित आणि संदीप हे देखील मुरादाबादचे (Moradabad) रहिवासी आहेत.






