Sanjay Gaikwad | बुलढाणा (Buldhana) येथे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) पुन्हा एकदा नव्या वादात अडकले आहेत. त्यांच्या दीड कोटी रुपयांच्या लक्झरी डिफेंडर कारवरून महायुतीतच आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजप (BJP) जिल्हाध्यक्षांनी ही गाडी ‘कमिशन’मधून आल्याचा गंभीर आरोप केला असून, त्यामुळे स्थानिक राजकारण तापले आहे.
‘दीड कोटींची गाडी कोणत्या कमिशनची?’
महायुतीमधील हा वाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उफाळून आला आहे. भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष विजय शिंदे (Vijay Shinde) यांनी आमदार गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर थेट निशाणा साधला. गायकवाड यांनी आणलेली दीड कोटींची लँड रोव्हर डिफेंडर (Land Rover Defender) कार कोणत्या कामातील ‘कमिशन’ आहे, असा खळबळजनक सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिंदे (Vijay Shinde) यांनी आरोप केला की, ही महागडी गाडी एका कंत्राटदाराच्या नावावर आहे. त्यांनी आगामी बुलढाणा (Buldhana) नगराध्यक्ष पदावर भाजपचाच हक्क सांगत, तरच युती होऊ शकते, असा इशारा दिला. तसेच, गायकवाड यांनी पूर्वी मतदारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा (वेश्यापेक्षा खराब) हवाला देत, त्यांना लोक नाकारतील, असेही शिंदे म्हणाले.
गाडी नातेवाईकाची, १००% कर्जावर: गायकवाड
भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या गंभीर आरोपांना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्यांनी स्पष्ट केले की, ज्या डिफेंडर कारची चर्चा होत आहे, ती गाडी निलेश ढवळे (Nilesh Dhawale) यांची आहे. निलेश हा आपला नातेवाईक, पक्षाचा कार्यकर्ता आणि कंत्राटदार असल्याचे त्यांनी सांगितले.
गायकवाड यांनी पुढे खुलासा केला की, निलेश ढवळे (Nilesh Dhawale) यांनी ही गाडी १०० टक्के कर्ज काढून खरेदी केली आहे. आपण ती गाडी फक्त काही दिवस वापरण्यासाठी बोलावली आहे. अनेक कार्यकर्ते आपल्या गाडीवर आमदाराचा सिम्बॉल लावतात, यात गैर काहीच नाही, असेही ते म्हणाले. मात्र, स्पष्टीकरण देतानाच त्यांनी, “ज्यांनी माझ्यावर कमिशनचे आरोप केले, त्या कुत्र्यांना मला उत्तर द्यायची गरज नाही,” अशा शब्दात विजय शिंदे यांच्यावर पलटवार केला.






